जाम चौकीतील घटना : पोलीस ठाणेही असुरक्षित समुद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन विभाग वर्धा यांनी कांढळी फाट्यावर ट्रॅक्टर क्र. एमएच ३२ ए ३३८८ हे ओव्हरलोड असल्याने चालान केले. ट्रॅक्टर जाम महामार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. जाम चौकीतून या ट्रॅक्टरची बॅटरी चोरट्याने लंपास केली. चालानचे २३ हजार ९९० रुपये ट्रॅक्टर मालक संदीप सोनटक्के रा. सिंदी (रेल्वे) यांनी अदा केली. यानंतर ते गाडी सोडविण्यासाठी जाम महामार्ग पोलीस चौकीत गेले. यावेळी ट्रॅक्टरमध्ये बॅटरी नसल्याचे निदर्शनास आले. चौकीतील वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांच्यासह कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता वाहनाची जबाबदारी आमची नाही, असे सांगितले. याबाबत समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांच्या ताब्यातील ट्रॅक्टरची बॅटरी चोरी जाणे ही शोकांतिकाच आहे. पोलिसांची चोरट्यांना भीती राहिलेली नसल्याचेच यावरून दिसते. पोलिसांनी ट्रॅक्टरची बॅटरी शोधून चोरट्याला अटक करावी, अशी मागणी सोनटक्के यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
जप्त ट्रॅक्टरची बॅटरी लंपास
By admin | Published: January 21, 2017 12:59 AM