लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनामुळे अर्थचक्र बिघडले असतानाच महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहेत. महामारीच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने आष्टी तालुक्यातील साहूर येथील रॅन्चोने बॅटरीवर धावणारी मोटारसायकल विकसित केली. (A battery-powered motorcycle developed by Sahur's Rahul in Wardha district)
राहुल वामन वडस्कर असे या ध्येयवेड्या युवकाचे नाव. तो लहानपणापासूनच हुशार मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गावातच शिक्षण घेतले. आष्टी गाठत पुढील शिक्षण घेतले. त्यापूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर ट्रेडमध्ये शिक्षण घेतले. नोकरी मिळावी म्हणून जिवाचा आटापिटा केला. मात्र, नोकरी मिळाली नाही. मात्र, यामुळे नाउमेद न होता राहुलने वडिलोपार्जित मोटर रिवाइंडिंगचा व्यवसाय कायम ठेवला. याच दरम्यान त्याच्यातील कल्पकता जागृत झाली. वाढत्या महागाईवर पर्याय म्हणून भंगारात पडून असलेली मोटारसायकल आणली. देशी जुगाड करीत बॅटरी, मोटर लावून अत्यल्प खर्चामध्ये बॅटरीवर धावणारी मोटारसायकल विकसित केली. ग्रामीण भागातील रॅन्चोने विकसित केलेली, बॅटरीवर धावणारी दुचाकी पाहण्याकरिता परिसरातील नागरिक गर्दी करीत असून राहुलचे कौतुक करीत आहेत.
पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच असून खर्च न झेपणारा आहे. गावोगावी फिरावे लागत असल्याने देशी जुगाड करून केवळ हजारांमध्ये ४ बॅटरीवर धावणारी दुचाकी तयार केली. बॅटरीवर तब्बल ८० किलोमीटरपर्यंत दुचाकी धावत असल्याने इंधनाचा खर्च वाचला आहे.
- राहुल वडस्कर, साहूर