वर्धा : लोकसभेच्या रणांगणात आत्तापर्यंत वर्धेतून पाच महिलांनी नशीब आजमावले. मात्र, त्यापैकी केवळ एकाच महिलेला खासदारकीची संधी मिळाली. त्यात काँग्रेसच्या प्रभा राव जायंट किलर ठरल्या होत्या.
लोकसभेच्या निवडणुकीत पूर्वी पुरुषांचीच मक्तेदारी होती. महिला अपवादात्मक स्थितीतच निवडणुकीच्या रणांगणात उतरत होत्या. मात्र, १९९८ पासून वर्धेच्या लोकसभा निवडणुकीत महिला रणांगणात उतरू लागल्या. त्यावेळी तत्कालीन जनता पार्टीच्या उमेदवारीवर सरोज काशीकर, तर अपक्ष म्हणून इंदुमती कृष्णराव वानखेडे यांनी उमेदवारी दाखल केली होती. एकूण १० उमेदवार रिंगणात होते. त्यात दोन महिला होत्या. त्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांना तीन लाख २८ हजार ९०५ मते, तर विरोधी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय मुडे यांना दोन ४५ हजार ८२२ मते मिळाली होती. सरोज काशीकर यांना २३ हजार ४५२, तर इंदुमती वानखेडे यांना ५१६ मते मिळाली होती.
यानंतर १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रभा राव या महिला उमेदवार होत्या. त्यांनी दोन लाख ४९ हजार ५६४ मते प्राप्त केली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुरेश वाघमारे यांना दोन लाख ४२ हजार ५०२ मते मिळाली होती. प्रभा राव यांच्या रुपाने १९९९ मध्ये प्रथमच एका महिलेला खासदारकीची संधी मिळाली होती. त्यानंतर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून प्रभा राव यांनी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली होती.
मात्र, भाजपचे सुरेश वाघमारे यांनी त्यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा संगीता सुनील कांबळे या महिला आंबेडकरीस्ट रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, त्यांना केवळ ७९८ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत एकही महिला उमेदवार नव्हती. मात्र, २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेसकडून प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस या महिला उमेदवार होत्या. तथापि, त्यांचा भाजपचे रामदास तडस यांनी पराभव केला होता.
यंदा आत्तापर्यंत एकही महिला नाही
२०२४ मधील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. यात मंगळवारपर्यंत १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत ६३ जणांनी १४१ अर्जांची उचल केली. मात्र, एकाही महिला उमेदवाराने उमेदवारी दाखल केली नाही.