लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने अठरा वर्षांवरील जोखमीच्या गटातील लोकांना बीसीजी लस देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात अशा सहा निकषात बसणाऱ्या ८३ हजार ७४८ पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सन २०२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरण करण्याचे राष्ट्रीय ध्येय ठेवले आहे. त्या अनुषंगाने राज्य क्षयरोग विभाग राज्य लसीकरण विभाग व आयसीएमआर यांच्या वतीने बीसीजी लसीकरण आज, गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे. बीसीजी लस ही लहान मुलांप्रमाणे प्रौढासाठीही उपयुक्त ठरत आहे. इतर आजाराविरोधातही लस परिणामकारक ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील ८३७४८ लाभार्थीनी लस घेण्यासाठी संमती दिली आहे. "टीबी-बीन" पोर्टलवर नोंदणी करण्यात आली असून, त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. बीसीजी ही लस १८ वर्षांवरील व्यक्ती खालील ६ पैकी कोणतेही १ किंवा अनेक निकष असलेली व लस घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीस देण्यात येणार आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व खासगी, सरकारी यंत्रणेने एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा व माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर यांनी केले आहे. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हेमंत पाटील यांनी लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा स्तरावरून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच लसीकरणाकरिता सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय कार्यशाळा लसीकरणसंदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली आहे. तालुकास्तरावर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
आर्वीमध्ये केलेय सर्वेक्षणउपजिल्हा रुग्णालय आर्वीच्या वतीने वीस वॉर्डात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत मे महिन्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आर्वीची एकूण लोकसंख्या ४४ हजार २४६ एवढी आहे. या सर्वेक्षणमध्ये ३३ हजार ५२९ जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १३८९ इच्छुक लाभार्थी लसीकरणासाठी नोंदणी केली.
लसीसाठी हे आहेत पात्रता निकष
- ६० वर्षांवरील वय असलेली व्यक्ती.
- बीएमआय १८ पेक्षा कमी असणे.
- मधुमेही व्यक्त्ती.
- स्वयमघोषित सध्या किंवा पूर्वी धूम्रपान करणारे व्यक्त्ती.
- जानेवारी २०२१ पासून सक्रिय टीबी रुग्णाच्या संपर्कात असणारे जवळील सहवासीत.
- मागील पाच वर्षांत टीबी झालेल्या व्यक्ती.
"जिल्हातील १८ वर्षांवरील पात्र ८३७४८ नागरिकांना आज, गुरुवारपासून बीसीजी लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे."- डॉ. राज पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा