महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवीन कोरोनाबाधित सापडण्याची गती मंदावली असली तरी सध्या डेंग्यू हा कीटकजन्य आजार डोके वर काढू पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४८ डेंग्यू बाधितांची नोंद घेण्यात आली असून एकाचा डेंग्यूने बळी घेतला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कोविड संकटातून थोडे सावरत नाही तो सध्या डेंग्यू आपले डोके वर काढत असल्याने आरोग्य विभागाच्या अडचणीत भर पडली आहे. गावागावात डेंग्यू जनजागृती माेहीम राबविली जात असली तरी घराच्या आवारात पावसाचे पाणी साचत असल्याने तसेच स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने हा प्रकार डेंग्यूचा प्रसाराचा पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात कुठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होत तर नाही ना याची शहानिशा करणे गरजेचे आहे. तर कूलरमधील पाणी नियमित बदलविण्यासह घराच्या आवारात कुठे पावसाचे पाणी साचत असल्यास ते वाहते करणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ डेंग्यू बाधितांची नोंद जिल्हा हिवताप अधिकारी विभागाने घेतली असून त्यापैकी एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यू हा आजार जीवघेणा ठरू शकत असल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे.
ही आहेत लक्षणेएकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापात चढ-उतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौचास होणे, पोट दुखणे आदी किटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आहेत.
जिल्ह्यात सध्या डेंग्यू हा कीटकजन्य आजार डोके वर काढू पाहत आहे. सर्व नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत; पण नागरिकांच्या सहकार्याशिवाय डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य नाहीच, हे नागरिकांनीही लक्षात घेतले पाहिजे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळल्यास डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लागेल. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. शिवाय आपल्या घराच्या आवारात कुठे डासाची उत्पत्ती तर होत नाही ना, याची शहानिशा करावी.- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा.