लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शुक्रवार १९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत वर्धा जिल्ह्यात तब्बल ४८७ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्यातील कोविड बाधितांची संख्या ११ हजार ४९२ झाली आहे. असे असले तरी या ४८७ नवीन रुग्णांपैकी २७८ कोविड बाधित एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. परिणामी, वर्धा तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक स्प्रेडर असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.प्राप्त माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यात १०८ नवीन कोविड बाधित सापडले असून त्यापैकी ७२ कोविड बाधित वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. शनिवार २० फेब्रुवारीला जिल्ह्यात ५६ नवीन कोविड बाधितांची भर पडली असून त्यापैकी ४६ रुग्ण एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. रविवार २१ फेब्रुवारीला जिल्ह्यात दीड शतक पार करीत तब्बल २५३ व्यक्तींना आपल्या कवेत घेतले असून त्यापैकी ७९ नवीन कोविड बाधित एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तर २२ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यात ४५ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी १६ कोविड बाधित वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तर मंगळवार २३ फेब्रुवारीला जिल्ह्यात तब्बल १२५ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी ६५ नवीन कोविड बाधित एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.शहरासह १३ गावात उपाययोजनांचा अभाव जानेवारी २०२१ उजाडताच वर्धा जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरूवात केली. इतकेच नव्हे तर नागरिकही गाफिल राहिल्याने कोरोनाने हळूहळू आपले पाय पसरविले. तर सध्या कोरोना हा वर्धा जिल्ह्यात रौद्ररुप धारण करू पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा विचार केल्यास मागील काही दिवसांपासून वर्धा तालुक्यातच सर्वाधिक नवीन कोविड बाधित सापडत असल्याने वर्धा तालुक्यात कोरोना संदर्भातील खबरदारीच्या उपाययोजनांची तसेच जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक सूचनेचे पालन करून घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
पाच दिवसांत कोविडने घेतला आठ व्यक्तींचा बळीशुक्रवार १९ ते मंगळवार २३ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात वर्धा जिल्ह्यातील आठ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २० रोजी दोन, २१ रोजी तीन तर २२ रोजी तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे.