शैलेश नवाल : दस्तऐवजाची पाहणी करावी वर्धा : नागरिकांनी मालमत्तेची, मिळकत पत्रिका, दानपत्र, बक्षीसपत्र खरेदी-विक्रीचा व्यवहार-पत्रक याद्वारे मालमत्ता खरेदी करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. सदर व्यवहार करताना महत्त्वाचे दस्तावेज तपासावेत. त्यात व्यवहाराशी संबंधित मालकी दर्शविणारा मुळ अभिलेख जसे गाव नमुना सातबारा, आखीव पत्रिका आदींची खात्री करावी. दस्तावेजातील नमूद सर्व्हे नंबर, भूखंड क्रमांक, आराजी, मालकाचे नाव, सत्ता प्रकार वर्ग-१, वर्ग-२ इत्यादी बाबी दस्तावेजात अचुक नोंदविलेल्या असल्याची खात्री करावी. संबंधित मालमत्ता कोणत्याही शासकीय योजनेत वाटपात मिळाली आहे काय याची खात्री करावी. मालमत्तेच्या खरेदी-विक्री, हस्तांतरणावर सक्षम प्राधिकारी, सक्षम न्यायालय यांचेकडून निर्बध लावण्यात आले का याची खात्री करावी. कोणत्याही परिस्थितीत शासकीय जमीन, भूखंड यांचा कोणताही व्यवहार सक्षम प्राधिकाऱ्यांचे मंजूरी आदेशाशिवाय करू नये. त्याबाबत यापूर्वी खरेदी, विक्री, हस्तांतरणाचा नोंदणीकृत दस्तावेज असला तरी खात्री करणे गरजेचे आहे. अतिक्रमण केलेल्या शासनाचे जागेवरील, भूखंडावरील कोणताही व्यवहार सक्षम प्राधिकाऱ्यांचे मंजूरी आदेशाशिवाय करू नये. संबंधित मालमत्ता शासनाच्या कोणत्याही प्रकल्पांतर्गत संपादित झाली असल्यास त्याचे कमी-जास्त पत्रक झाले आहे तसेच क्षेत्र दुरुस्ती करण्यात आली आहे काय याची खात्री करावी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी जमीनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना दक्षता घेतली पाहिजे, असेही नवाल यांनी कळविले आहे.(शहर प्रतिनिधी)
मालमत्ता व्यवहार करताना दक्षता घ्यावी
By admin | Published: April 28, 2017 2:13 AM