लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जंगल परिसरात वास्तव्य असलेले एक अस्वल पाण्याच्या शोधार्थ अचानक वर्धा शहराच्या शेजारी असलेल्या शांतीनगर परिसरापर्यंत पोहोचले. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंत् त्या अस्वलाला त्याच्या अधिवासात पोहोचविण्यासाठी वनविभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या हे अस्वल बोरगाव (नांदोरा) परिसरात असून त्याच्या मागावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आहेत. शिवाय परिसरातील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.वर्धा शहराशेजारील शांतीनगर भागात अस्वलाचा मुक्त संचार होत असल्याची माहिती वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांना मिळाली. त्यानंतर यांच्यासह वनविभागाचे शेख व इतर वनकर्मचाऱ्यांनी शांतीनगर परिसर गाठला. शिवाय मानव व वन्यजीव संघर्ष होऊ नये या हेतूने या परिसरातील ग्रामस्थांना दक्षतेबाबत सूचना देत तिला तिच्या अधिवासात जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला. वनविभागाकडून राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान शनिवारी सायंकाळी ७ वाजतेपर्यंत या अस्वलाला गणेशपूर, पांढरकवडा पारधी बेडा मार्गे बोरगाव (नांदोरा) पर्यंत पोहोचविण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. बोरगाव (ना.) येथून जवळच आर्वी तालुक्यात येणारे ढगा जंगल आहे. हे अस्वल पाण्याच्या शोधार्थ वर्धा शहरापर्यंत पोहोचले असावे असा कयास वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे खरांगणा वन परिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्यांची दैनावस्था झाल्याने आता वन्यजीव शहराकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.