लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भूगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील कंपनीत झालेला अपघात दुर्दैवी आहे. या प्रकरणी कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. यात जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर नक्कीच कठोर कारवाई हाेईल. राहिला प्रश्न जखमी कामगारांना आर्थिक मदत मिळण्याचा तर ज्यांना जशी दुखापत आहे त्यानुसारच त्यांना आर्थिक मदत कंपनीकडून दिली जाईल. त्यासाठी प्रयत्नही केले जाईल, असे आश्वासन जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण, बहूजन कल्याण विभाग व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.ना. बच्चू कडू यांनी शनिवारी सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उत्तमच्या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, प्रशासकीय अधिकारी गिरीश देव, निता शेटे, डॉ. दिलीप गुप्ता, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे आदींची उपस्थिती होती. ना. कडू पुढे म्हणाले, उत्तम गलवा कंपनीत झालेल्या घटनेच्या संदर्भात काही अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. ते अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्राप्त होईल. या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या हेतूने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. या प्रकरणी भादंविची कलम ३२४ तसेच ३०७ वाढविता येते काय याचीही माहिती घेतली जाईल. एकूणच हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांचा अंत केंद्र सरकारने पाहू नयेसंपूर्ण देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे असच दुर्लक्ष केले तर उद्रेक होईल. दिल्ली येथील आंदोलनाला दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला आहे. हे आंदोलन देशातील सर्वात मोठे आंदोलन आहे. मोदी सरकार ज्या पद्धतीन शेतकऱ्यवर वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहे हे चुकिचे आहे. कायदा मागे घेतल्यावर नुकसान काय होईल, कोणाच्या तिजोऱ्या कमी होतील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावे. नुकसान काहीच होत नसेल तर कायदा मागे घ्यायला अडचण काय आहे हा ही प्रश्न आहे. मला अस वाटत की सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये. असेच चालू राहील तर त्याचा उद्रेक होईल, हे मात्र निश्चित, असे मतही ना. बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.