शासकीय यंत्रणेकडून जनजागृती : वर्षभरात १८ हजार १४८ मुलांचा जन्म गौरव देशमुख वर्धा दिवसेंदिवस कमी होत असलेला मुलींच्या जन्मदर वाढविण्याकरिता शासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या मध्यंतरी बेटी बचाव अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सर्वत्र जनजागृती करण्यात आली. असे असतानाही वर्धेत गत आर्थिक वर्षात मुलांच्या तुलनेत तब्बल ८८१ मुली असल्याचे दिसून आले आहे. ही टक्केवारी जिल्ह्यात गत अनेक वर्षांपासून कायम असून ही बाब जिल्ह्याकरिता विचार करावयाला लावणारी आहे. ‘बेटी बचाओ’करिता शासनाच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र वर्धेत हा निधी वाया जात असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गोष्टीकरिता पायलट ठरणारा वर्धा जिल्हा या बाबतीत का माघारतोय, याचे चिंतन करण्याची गरज आरोग्य विभागावर आली आहे. ही नोंद अशीच घसरत राहिली तर राज्यात नाव कमविणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर नाम गमविण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. वर्धेत जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, सहा ग्रामीण रुग्णालये व जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाचे कार्य सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या १२ महिन्याच्या काळात शासकीय आकडेवारी पाहिली असता यात मुलींची संख्या कमीच असल्याचे दिसून आले आहे. गत १२ महिन्यात २५ हजार ४१५ प्रसुती झाल्या. यात १२ हजार २६७ मुली तर १३ हजार १४८ मुलांचा जन्म झाल्याची नोंद झाली आहे. या आकडेवारीचा विचार केल्यास यात मुलांच्या तुलनेत ८८१ मुली कमी असल्याचे दिसून आले आहे. यात वर्धा जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व सहा ग्रामीण रुग्णालय यांच्या सेवेत ७ हजार ८३७ प्रसुती झाल्या यात ४ हजार ७६ मुलांचा समावेश असून ३ हजार ७६१ मुलींचा जन्म झाला आहे. तर जिल्हा आरोग्य विभागाच्या सेवेत १७ हजार ५७८ प्रसुती झाल्या आहेत. ९ हजार ७२ मुलांचा जन्म झाला तर ८ हजार ५०६ मुलींचा जन्म झाला आहे. यात संपूर्ण प्रसुती मधील मुलांच्या जन्मदरापैकी मुलींचा जन्मदर ८८१ ने कमी आहे. कमी होत असलेली आकडेवारी चिंतेचा विषय ठरत आहे.आज आपण २१ व्या शतकात वावरत आहो, जग खुप बदलेले आहे. आज मुलगी मुलापेक्षा कमी नाही. मुलगी अभ्यासात हूशार आहे तेवढी मुले सुद्धा नाही. आरोग्य क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रातही मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुलगा मुलगी भेद नको.- डॉ. एन.बी. राठोड, अतिरिक्त शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.
‘बेटी बचाओ अभियान’ तरीही मुलांच्या तुलनेत ८८१ मुली
By admin | Published: April 21, 2017 1:53 AM