वर्धा : तक्रारकर्त्यांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी पोलीस विभागात आता ‘डायल ११२’ ही नवी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तक्रारकर्त्याने फोन केल्यास दहाव्या मिनिटाला मदत दिली जाते. मात्र, ११२ क्रमांकावर फेक कॉल करणारेही असतातच. त्यामुळे या क्रमांकावर फेक कॉल केल्यास खबरदार, गुन्हादेखील दाखल होऊ शकतो.
राज्य सरकारने सर्वच टोल फ्री क्रमांक आता एका डायल ११२ या क्रमांकावर आणले आहेत. ११२ क्रमांकावर कॉल केल्यास अवघ्या दहाव्या मिनिटाला मदत पोहोचविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वतंत्र कंट्रोल युनिट स्थापन करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक वाय. एस. किचक, खैरकार तसेच महेंद्रा कंपनीचे अभियंता निखिल ढोक आणि रुकेश ढोले हे काम सांभाळत आहेत.
२७ सप्टेंबरपासून डायल ११२ ही नवी अत्याधुनिक प्रणाली वर्धा जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमध्ये अत्याधुनिक पोलीस वाहनेही उपलब्ध झाली असून, तक्रारदाराला क्विक रिस्पॉन्स मिळत आहे. मात्र, नवरा भांडतोय, बायको मारतेय, मुलगा अभ्यास करीत नाही, अशी कारणे सांगणे तसेच फेक कॉल करून पोलिसांचा वेळ वाया घालवून त्यांना त्रास देणे आता महागात पडणार आहे. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज असून, असे केल्यास त्यांच्यावरच गुन्हा दाखल होणार आहे.
तत्काळ मदतीसाठी २७४ जणांची फौज
जिल्ह्यात डायल ११२ ‘क्विक रिस्पॉन्स व्हेईकल’ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्वतंत्र युनिटमधून नागरिकांच्या कॉलला तत्काळ रिस्पॉन्स दिला जात आहे. जिल्ह्यात तब्बल २७४ जणांची फौज मदतीसाठी धावत आहेत.
तीन महिन्यांत ५४० कॉल
सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या डायल ११२ या नव्या प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. तत्काळ मदत पोहोचत असल्याने पोलिसांची प्रतिमादेखील उंचावत आहे. सप्टेंबर महिन्याच्या चार दिवसांत ३० कॉल, ऑक्टोबर महिन्यात २७४ आणि नोव्हेंबरमध्ये २३६ अशा एकूण ५४० नागरिकांपर्यंत पोलीस मदत तत्काळ पोहोचविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बायको भांडतेय, यासाठी कशाला हवी मदत
डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तत्काळ पोलीस मदत पोहोचविण्यात येते. मात्र, अनेकदा बायको भांडण करतेय, नवरा दारू पिऊन मारहाण करतो, मुलगा अभ्यास करीत नाही, सासू वाद करते, आदीप्रकारचे कॉल येतात. त्यामुळे अशा कॉलमुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. त्यामुळे अशा क्षुल्लक कारणांसाठी ११२ वर कॉल करून मदत मागतानाही दहावेळा विचार करण्याची गरज आहे.
याच कारणासाठी करावा कॉल
एखादा गंभीर गुन्हा घडला असेल, गावात जबर हाणामारी होत असेल, कुणी आत्महत्या केली असेल, खून झाला असेल, कुणी रक्तबंबाळ अवस्थेत पडून असेल, तर अशावेळी डायल ११२ या अत्याधुनिक प्रणाली असलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा, जेणेकरून तत्काळ मदत पोहोचविली जाईल, विनाकारण फोन कॉल करून पोलिसांना त्रास न देण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
फेक कॉल करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल
फेक कॉल करून पोलिसांना त्रास देणाऱ्यांची कुंडली बाहेर काढली जाईल. त्याने कुठून कॉल केला, त्याचे नाव काय, हे सर्व पोलीस यंत्रणेत दिसणार असून, फेक कॉल करणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण कॉल करून त्रास देणे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस कंट्राेल रुमला फेक कॉल करून त्रस्त करणाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. फेक कॉल केल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते;पण हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाय जातो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता थेट गुन्हाच दाखल करण्यात येईल. नागरिकांनी याबाबतची दक्षता घ्यावी.
प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.