सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: १९६४ साली संस्थोची नोंदणी झाल्या महाराष्ट्रासह विदर्भातील अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत लहानुजी महाराज संस्थानच्या गोशाळेला १ कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानामुळे येथे विविध कामे होणार असून सध्या तेथे शेणापासून बायोगॅसची निर्मिती केली जात आहे. उल्लेखनिय म्हणून अनुदान प्राप्त झालेली जिल्ह्यातील ही एकमेव गोशाळा आहे. सदर अनुदान चार टप्प्यांमध्ये मिळणार आहे.या गोशाळेत शेणापासून बायोगॅस निर्मिती केली जात आहे. शिवाय मंदिरात दररोज येणाऱ्या ३०० भक्तांना महाप्रसाद याच बायोगाच्या माध्यमातून विद्युत निर्मिती करून शिजविल्या जातो. शिवाय परिसरात विद्युत पुरवठा व पाणी पुरवठाही करण्यात येतो. येथे असणाºया गोशाळेत दररोज ५०० किलो शेण तयार होते. त्याच्या माध्यमातून १५ किलोवॅट विद्युत निर्मिती होते. आर्वी पासून १२ कि़मी. अंतरावर असलेले टाकरखेडा हे संत लहानुजी महाराज यांच्या कर्मभूमिने पावन झालेले स्थळ. १९६४ मध्ये या संस्थानची नोंदणी करून गोशाळेची सुरूवात करण्यात आली. या संस्थानचे अध्यक्ष स्व. भय्याजी पावडे यांचे २०११ साली निधन झाले. त्यानंतर या संस्थांनच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांचा मोठा मुलगा बाळासाहेब पावडे याने स्विकारली. २०११ पासून या गोशाळेकडे कृषी विभागातून निवृत्त झालेल्या व कृषी विषयक उत्तम जाण असणाऱ्या बाळासाहेबांनी गोशाळेच्या माध्यमातून सुरूवातीला ६५ गायींचे पालन-पोषण करण्यास सुरूवात केली. सध्या या गोशाळेत ३२२ गाय वासरू व ३५ बैलजोड्या असल्याचे सांगण्यात आले. सदर गोशाळेत ७० टक्के गायी गवळाऊ प्रजातींच्या आहेत. संस्थानची टाकरखेडा परिसरात ४० एकर शेती आहे. यापैकी २० एकरात गायींसाठी चाऱ्याची लागवड केली जाते. इतकेच नव्हे तर प्रत्येक गायीचे आरोग्य सुदृढ रहाव म्हणून तिला दररोज कडधान्याचा पोस्टीक आहारही दिल्या जातो. २०१३ या वर्षात या संस्थानच्या माध्यमातून १५ हजार स्केअर फुट जागेवर गोशाळा व बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात आला. १०५ घन मिटरच्या तीन सिमेंटच्या टाकीतून या शेणाचे वर्गीकरण करून शुद्ध शेण व त्यापासून गॅस तयार करण्यात येते. ती गॅस एका बलूनमध्ये साठवून तेथे असणाऱ्या भक्तांच्या स्वयंपाक गृहाला दिल्या जाते. येथे या गॅसच्या माध्यमातून दररोज १५ किलोवॅट विद्युत निर्मिती करीत ३०० भक्तांसाठी स्वयंपाक तयार करण्यात येतो. शिवाय मंदिर परिसरात विद्युत पुरवठा व पाच वॅटची पाणी पुरवण्याची विद्युत मोटर यावर चालविली जाते. यातून संस्थानला विद्युत देयकाची वार्षिक पाच लाखाची बचत होत आहे. या बायोगॅसच्या वेस्ट मटेरियलपासून गांडूळ खत निर्मिती करण्यात येते. दररोज २ हजार किलो गांडुळखत तयार केल्या जात आहे. तसेच संस्थानच्या विषमुक्त शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी गोशाळेत गोमुत्रापासून शेतपिकांवर फवारणीसाठी किटकनाशक, फिनाईल, परसबागेतील फुलासाठी खत तयार केले जात आहे. या गोशाळेचे व्यवस्थापन करण्यासाठी पाच जणांचे व्यवस्थापन नियुक्त करण्यात आले आहे. या गोशाळेतील जनावरांसाठी गोपीकृष्ण नावाचे गवत व जिओ पाच या प्रजातीचे गवत गायींना दिल्या जाते. शिवाय मंदिर परिसरातील परसबागेत पिकविलेला विषमुक्त भाजीपाल्याचा वापर भक्तांसाठी तयार करण्यात येणाºया भाजीसाठी वापरण्यात येत आहे. गावातील शाळा व अंगणवाडीच्या चिमुकल्यांनाही येथील अन्न पोष्टीक आहार म्हणून दिल्या जाते. येथील संस्थानला कृषी क्रांतीचे जनक स्वामीनाथन यांनी भेट देवून ३ लाखांची मदत दिली होती. त्यांच्याच प्रेरणेने येथे शेतकरी प्रशिक्षण शाळा चालविल्या जाते. शिवाय शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही केले जाते. या संस्थानच्या अन्नदान ठेव योजनेत २.७० कोटींची रक्कम आहे. या संस्थानमध्ये आठवडाभर मोफत रुग्णसेवा व औषधी दिल्या जाते. संस्थेत ३५ निराधार राहत असून त्यांना मुलभूत सुविधा संस्थान पुरविते. मंदिर परिसरातील सांस्कृतिक भवन विविध कार्यक्रमासाठी अत्यल्पदरात सामान्यांना दिल्या जात असून ती रक्कम अन्नदान ठेव योजना, मंदिर देखभाल व गोशाळेवर खर्च होते.निर्माल्याचा वापर गांडूळ खतासाठीमंदिर परिसरात गोळा होणारे निर्माल्य हे गांडुळ खतासाठी वापरल्या जाते. या गोशाळेत दररोज ५०० किलो शेण तयार होत असून त्यातून बायोगॅसची निर्मिती केल्या जाते. या शेणापासून दररोज किती गॅसची निर्मिती होते याची मापकयंत्रात नोंद घेतल्या जाते. या गोशाळेच्या माध्यमातून बायोगॅसची निर्मिती करीत त्याचा वापर करून शिजविण्यात येणाऱ्या महाप्रसादाचा आतापर्यंत १ लाख ७७ हजार भाविकांनी लाभ घेतल्याचे सांगण्यात आले.तर सदर गोशाळेत या पुढे दुग्ध उत्पादन वाढविणे व पंचगव्य निर्मिती करण्याचा संस्थेचा मानस असल्याचेही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
टाकरखेड गोशाळेला १ कोटीचे अनुदान मंजूर झाल्याने या गोशाळेला जिल्ह्यात महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी या शाळेचे सुव्यवस्थापन करण्यात आले. पुढे येथे येणाऱ्या भाकड गायींचे व्यवस्थापन पंचगव्य व गोमुत्रापासून औषधी निर्मिती करणे, दुग्ध उत्पादन, तूप उत्पादन व शेतकऱ्यांना जनावरे पालनपोषण करून दुधाचे उत्पादन वाढविणे गायींचे महत्त्व पटवून येथील गोशाळेत पंचगव्य वस्तू तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे.- बाळासाहेब पावडे,अध्यक्ष, संत लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेडा ता. आर्वी.