जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : जिल्ह्यात नाचणगावातून उपक्रमास प्रारंभ नाचणगाव : अन्न नागरी पुरवठा विभाग तसेच ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून स्वस्त धान्य दुकानात बायोमेट्रीक पद्धतीची सुरुवात करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात नाचणगाव या देवळी तालुक्यातील गावात एस.एन. राऊत यांच्या धान्य दुकानात बायोमॅट्रीक पद्धतीने धान्य वितरण करण्यात येत आहे. या पद्धतीची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी पाहणी केली. तहसीलदार तेजस्विनी जाधव यांच्या हस्ते बायोमॅट्रीक पद्धतीने धान्य वितरण योजनेचा शुभारंभ झाला. येथून ही योजना कार्यान्वित झाली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी सदर दुकानाला भेट दिली. यावेळी त्यांनी बायोमॅट्रीक धान्य वतरण प्रणालीची माहिती जाणून घेतली. योजना सुरू झाल्यापासून किती ग्राहक झाले. उपस्थित ग्राहकांना काही तक्रारी आहे काय, याबाबतही नवाल यांनी विचारणा केली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी वितरण कसे होते याची शहानिशा करण्यासाठी या दुकानातील ग्राहकाला सदर बायोमॅट्रीक मशीनवर अंगठ्याचा ठसा उमटवून प्रिंट निघत असल्याची प्रात्यक्षिकाद्वारे खात्री करून घेतली. यावेळी तहसीलदार तेजस्विनी जाधव, नायब तहसीलदार भागवत, मंडळ अधिकारी काळुसे, तलाठी डेहनकर तसेच नागरिक उपस्थित होते.(वार्ताहर)
बायोमेट्रिक धान्य वितरणचे घेतले प्रात्याक्षिक
By admin | Published: January 21, 2017 12:54 AM