लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेनंतर थेट जनतेतून होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी भाजपा समर्थित उमेदवारांना कौल दिल्याचे दिसते. जिल्ह्यात ५६ च्यावर ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला दावा केला आहे. तर २४ ग्रामपंचायती काँग्रेसच्या आणि तीन ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉग्रेस आणि तीन ग्रामपंचायतीत शिवसेना समर्थित पॅनलने विजय मिळविल्याचा दावा या पक्षांकडून करण्यात आला आहे.वर्धेत झालेल्या या निवडणुकीत भाजपाने जिल्ह्यात पुन्हा आपणच म्हणत बाजी मारल्याचे दिसते. काही महत्त्वाच्या मानल्या जाणाºया आणि प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीत भाजपाला मात्र तोंडघसी पडावे लागले. तर हिंगणघाट येथे एका जागेवर भाजपा आणि सेनेने आपला दावा केला असून ती ग्रामपंचायत नेमकी कोणाची, असा प्रश्न पडला आहे.जिल्ह्यात मुदत संपत असलेल्या एकूण ९१ ग्रामपंचायतीकरिता निवडणूक होवू घातली होती. यातील पाच ग्रामपंचायती अविरोध ठरल्या होत्या. उर्वरीत ८६ ग्रामपंचायतीकरिता सोमवारी मतदान झाले. त्याची टक्केवारी ७७.१२ टक्के आहे. त्याची मोजणी आज झाली. या मोजणीत मतदारांनी भाजपाला कौल दिल्याचे दिसून आले. वर्धा तालुक्यात आठ ग्रामपंचायतीची निवडणूक होती. यापैकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली. तर उर्वरीत सात ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला दावा केला आहे. तर महत्त्वाची म्हणून नोंद असलेल्या पिपरी(मेघे) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनलने विजय संपादीत केला.समुद्रपूर तालुक्यात सात ग्रामपंचायतीची निवडणूक होती. यातील पाच ग्रामपंचायतीवर भाजपाने झेंडा रोवला तर राकॉ आणि प्रहार संघटनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. हिंगणघाट तालुक्यात भाजपाने नऊ जागेवर ताबा मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक, शेतकरी संघटनेला एक आणि अपक्षाला एका ग्रामपंचायतीत जागा मिळाली. काँग्रेसचा गड म्हणून ओळख असलेल्या आर्वी उपविभागातून आर्वीतील काँग्रेसने आपली बाजू राखत ११ ग्रामपंचायतीवर आपली सत्ता स्थापन केली. १० ग्रामपंचायती भारतीय जनता पक्ष, दोन राकॉ आणि तीनवर शिवसेनेने आपला दावा केला आहे.कारंजा तालुक्यात १७ ग्रामपंचायतीची निवडणूक होवू घातली होती. यात दोन ग्रामपंचायती अविरोध ठरल्या तर उर्वरीत १५ पैकी नऊ जागा भाजपाच्या ताब्यात गेल्या आहेत. काँग्रेस सहा आणि दोन जागा अपक्षांनी बळकावल्या आहेत. आष्टी तालुक्यात सहा ग्रामपंचायतीकरिता निवडणूक होवू घातली होती. यातील एक ग्रामपंचायत अविरोध ठरली. तर उर्वरीत पाच पैकी दोन भाजपा, दोन काँग्रेस आणि एक अपक्षाच्या ताब्यात गेली आहे.खासदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या देवळीत मात्र काँग्रसने बाजी मारत भाजपाला मागे टाकले. येथे काँग्रेसने सहा ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकाविला. तर भाजपाला चार ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. दोन ग्रामपंचायती अपक्षांनी आपल्या ताब्यात घेतल्या तर एक ग्रामपंचायत शेतकरी संघटनेच्या ताब्यात गेली.सेलू तालुक्यात २३ ग्रामपंचायतीची निवडणूक होती. मात्र येथे चिन्ह वाटपावरून झालेल्या गडबडीवरून येथील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. यामुळे येथे केवळ दोनच ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या दोन्ही ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला दावा केल्याची माहिती आहे. मात्र तशी अधिकृत माहिती आली नाही.सोमवारी झालेल्या मतदानाची मंगळवारी मोजणी झाली. या मोजणीला सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. दुपारपर्यंत साधारणत: सर्वच ग्रामपंचायतीचे निकाल स्पष्ट झाल्याने विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केल्याचे चित्र जिल्हाभर होते.पिपरी ग्रामपंचायतीवर राकॉ समर्थितांचा झेंडावर्धा तालुक्यात शहरालगत असलेली पिपरी (मेघे) ग्रामपंचायतीची निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. जिल्हा परिषदेच्या पराभवानंतर येथे अस्तित्व टिकविण्याकरिता भाजपाने आपला पूर्ण जोर लावला होता. येथे उभ्या असलेल्या संजय ठाकरे यांच्या विजयाकरिता भाजपाचे खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सतत सभांचे सत्र सुरू केले होते. यावेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनाला येथील नागरिकांनी नाकारल्याचे येथील निकालावरून दिसत आहे. शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीत राजकीय आणि नागरी दृष्ट्या महत्त्वाची म्हणून ओळख असलेल्या या ग्रामपंचायतीत भाजपाचा उमेदवार तिसºया क्रमांकावर राहिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित पॅनलचे उमेदवार अजय गौळकर यांचा एकतर्फी विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी ठरलेले उमेदवार सतीश इखार यांना २,३०१ मते मिळाली. तर अजय गौळकार यांना ४,३५२ मते मिळाली. त्यांनी २०५१ मतांनी विजय मिळविला. हा विजय जिल्ह्यात सर्वाधिक मताचा विजय असल्याचे बोलले जात आहे. या ग्रामपंचायतीत केवळ गौळकारच नाही तर त्यांच्या पॅनलमध्ये असलेल्या १३ उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. यात माजी सरपंच कुमुद लाजुरकर यांनी सदस्यांत सर्वाधिक मताधिक्क्याने विजय मिळविल्याचे सांगण्यात आले आहे.३५ जणांनी केले पोस्टल पद्धतीने मतदानवर्धा तालुक्यातील ८ ग्रा.पं.साठी ४० जणांना पोस्टल मतदान पत्रिका वितरीत करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३५ जणांनी त्याचा वापर केला. पोस्टल पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणारे हे ३५ मतदार पिपरी (मेघे) ग्रा.पं. मधील रहिवासी आहेत, हे उल्लेखनीय. यात सतीश इखार यांना २०, अजय गौळकार आठ आणि संजय ठाकरे यांना सात मते मिळाली.
५६ ग्राम पंचायतींवर भाजपाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:38 PM
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेनंतर थेट जनतेतून होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी भाजपा समर्थित उमेदवारांना कौल दिल्याचे दिसते.
ठळक मुद्दे८६ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर : कॉग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचाही ग्रामपंचायतींवर झेंडा