अभिनय खोपडेवर्धा : वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघांपैकी दोन जागी काँग्रेस तर दोन जागांवर भाजपचे आमदार आहेत. त्यांच्यासमोर मतदार संघ टिकविण्याचे आव्हान आहे. साडेचार वर्षांत भाजपसाठी पोषक वातावरण असून दुसरीकडे सततच्या पराभवाने काँग्रेस अजूनही अडचणीत असल्याचे दिसत आहे. चार ते पाच गटांत विभागलेल्या काँग्रेसला आगामी निवडणूक जिंकण्यासाठी परिश्रम करावे लागणार आहे.
सेना-भाजपची युती झाली आहे. २०१४ पूर्वी सेना-२ तर भाजप-२ जागांवर विधानसभा निवडणूक लढवित होते. आता हिंगणघाट व वर्धा मतदार संघात भाजपचे समीर कुणावार व डॉ. पंकज भोयर आमदार आहेत. हे दोन्ही मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याचे आहेत. मात्र विद्यमान आमदारांचे तिकीट कापून भाजप हे मतदार संघ शिवसेनेला देणार नाहीत, असे भाजपचे स्थानिक नेते ठामपणे सांगत आहेत. हिंगणघाट मतदार संघात समीर कुणावार यांनी २००९ मध्ये ६५ हजारांवर मतांनी विजय मिळविला होता. त्यानंतर अनेक लहान-मोठ्या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा झंझावात कायम राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत रामदास तडस यांना या मतदार संघातून ३८ हजार मतांची आघाडी मिळाली. या मतदार संघावर शिवसेनेचा प्रबळ दावा आहे. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे येथून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला हा मतदार संघ असून माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी हे प्रबळ दावेदार मानले जातात.दुसरीकडे मनसेकडून अतुल वांदीले यांच्या नावाची चर्चा आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पुन्हा कंबर कसली आहे. मात्र संघ विचारांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे मनोमिलन झालेले नाही. पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा भोयर यांच्या उमेदवारीला विरोध आहे. येथून भाजपकडून माजी खासदार सुरेश वाघमारे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, सचिन अग्निहोत्री, राणा रणनवरे यांच्या नावांची चर्चा आहे. हा मतदार संघ काँग्रेसकडे असून शेखर प्रमोद शेंडे हे दोन वेळा पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळते की पक्ष नवीन चेहरा देतो, याकडे लक्ष आहे. माजी आमदार माणिकराव सबाने यांचे पुत्र पराग सबाणे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, अमित गावंडे हे प्रमुख दावेदार आहेत. शेंडे कुटुंबाला तिकीट द्यायचे झाल्यास आमदार रणजीत कांबळे हे शेंडे यांचे जेष्ठ सुपुत्र रवी यांचे नाव पुढे करू शकतात. देवळी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे रणजीत कांबळे आमदार आहेत. दोन निवडणुका त्यांनी निसटत्या फरकाने जिंकल्या. यावेळी त्यांना तगडे आव्हान देण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे.येथून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी जि.प.सभापती मिलींद भेंडे, माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष गोडे यांचे नाव घेतले जात आहे. ऐनवेळी सहकार नेते सुरेश देशमुख यांचाही नंबर लागू शकतो. देशमुख सध्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे भाजप नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. देवळीत सेनेजवळ आमदार रणजित कांबळे यांना लढत देणारा तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजप काय निर्णय घेते, याकडे महत्त्वाचे आहे. आर्वी येथे काँग्रेसचे आमदार अमर काळे यांना भाजपशी तगडी लढत द्यावी लागणार आहे. येथे भाजपमध्ये माजी आमदार दादाराव केचे, नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय सुधीर दिवे व राहुल श्रीधर ठाकरे हे प्रमुख दावेदार आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. याशिवाय वंचित बहुजन आघाडी, बसपा यांनीही जोरदार तयारी चालविली आहे.एकूण जागा : ४ । सध्याचे बलाबलभाजप-०२, कॉँग्रेस-०२२०१४च्या निवडणुकीत सर्वात मोठा विजयहिंगणघाट : समीर कुणावार (भाजप) फरक : ६५,१७५सर्वात कमी मताधिक्क्याने पराभव - आर्वी : दादाराव केचे (भाजप) ३,१४३ (विजयी : अमर काळे, काँग्रेस)