लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेही जोरात कामाला लागले आहेत. अशातच आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्याम.पंत) येथे ग्रा.पं.च्या आरओ वॉटर प्लांटवरून भाजपा- काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. बुधवारी झालेल्या या हाणामारीचा गुरुवारी सर्वत्र व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.तळेगाव येथील ग्रा.पं.कडून आरओ वॉटर प्लांटकरिता उड्डाणपूल चौकातील जागा निवडण्यात आली. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नसतानाही या जागेवर आरओ प्लांट उभारल्यास अपघाताचा धोका संभावतो, तसेच तेथील व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे व्यावसायिकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्यात आहेत. या अनुषंगाने महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मोक्यावर जाऊन जागेची मोजणी केली. ही मोजणी सुरू असतानाच व्यावसायिक तथा काँग्रेस कार्यकर्ते प्रमोद चोहतकर आणि भाजपाचे जिल्हा सचिव सचिन होले यांच्यामध्ये वादावादी होऊन हातापाई सुरू झाली. त्याचे चित्रीकरण झाल्याने सध्या तळेगावात राजकीय वातावरण तापलेले आहे. यासंदर्भात तळेगावचे पोलीस निरीक्षक गजभिये यांना विचारणा केली असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगितले. आज सचिन होले यांनी या घटनेच्या निषेधार्थ सभा घेऊन काँग्रेसकडून सातत्याने विकासकामांना विरोध होत असल्याचा आरोप केला.
आरओ प्लांटला आमचा विरोध नाही; परंतु जी जागा निवडली ती चुकीची असल्याने आम्ही सर्व ९१ व्यावसायिकांनी स्वाक्षरी करून संबंधित विभागाला तक्रार केली. त्यानुसार काल महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी जागा मोजण्याकरिता आले होते. मोजमाप सुरू असताना होले तेथे आले आणि त्यांनी आरओ प्लांट माझ्या दुकानासमोर लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकारी नसताना ही लुडबुड कशाला, असा जाब विचारला असता अंगावर धावून मारहाण केली. मी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. आता या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. -प्रमोद चोहतकर, व्यावसायिक तथा काँग्रेस कार्यकर्ता
उड्डाणपुलाच्या चौकामध्ये नेहमी वर्दळ राहत असल्याने त्या ठिकाणी सर्वसामान्यांना अत्यल्पदरात शुद्ध पाणी मिळावे याकरिता दर्शनी भागातील जागा निवडली. याला सुरुवातीपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. अखेर जागेची मोजणी केली असता आरओ प्लांटकरिता निवडलेली जागा महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीबाहेर दिसून आली. त्यामुळे विनाकारण काँग्रेस कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. -सचिन होले, जिल्हा सचिव, भाजपा