पं. स. सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक : सेलू व हिंगणघाट येथे ईश्वरचिठ्ठीने फैसला वर्धा : जिल्ह्यातील आठही पंचायत समितीची निवडणूक मंगळवारी तालुकास्तरावर पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यात आठही पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकला. वर्धेत सत्तेकरिता भाजपा आणि राकॉ एकत्र आले. यात सभापतिपद भाजपाला आणि उपसभापतिपद राकॉला देण्याचे ठरले. यात ऐन मतदानाच्यावतीने घोळ झाला. भाजपाला सभापतीपद मिळाले मात्र राकॉला उपसभापतिपदापासून वंचित रहावे लागले. उपसभापती अनपेक्षितपणे अपक्षाने बळकावले. तर हिंगणघाट आणि सेलू येथे सभापतिपदाचा फैसला ईश्वर चिठ्ठीने झाला. येथे भाजपाचे सभापती निवडून आले. सेलू : येथील पंचायत समिती सभापतिपदी भाजपाच्या ज्योती खोडे तर उपसभापती काँग्रेसच्या सुनीता दीपक अडसड यांची ईश्वरचिठीने निवड झाली. भाजप व काँग्रेसकडे प्रत्येकी सहा सदस्य असल्याने ईश्वरचिठ्ठीने निवड झाली. सभापतिपदाकरिता भाजपाकडून ज्योति खोडे (केळझर गण) तर काँग्रेसकडून प्रणिता प्रदीप भुसारी (वघाळा गण) यांचे नामांकन होते. उपसभापतिपदासाठी भाजपाचे अशोक भगवान मुडे (हिंगणी गण) तर काँग्रेसचे नरेश तलवारे (वघाळा गण) व सुनीता अडसड (आमगाव गण) यांचे नामांकन होते. काँग्रेसने नरेश तलवारे यांनी माघार घेतली. त्यामुळे सभापतिपदासाठी भाजपाच्या ज्योती खोडे व काँग्रेसच्या प्रणिता भुसारी यांच्यात झालेल्या ईश्वरचिठ्ठीत खोडे विजयी झाल्या तर उपसभापतिपदाकरिता भाजपाचे अशोक मुडे व काँग्रेसच्या सुनीता अडसड यांच्यात ईश्वरचिठ्ठीने सुनीता अडसड विजयी ठरल्या. निवडणूक अधिकारी म्हणून विवेक इलमे तर सहायक म्हणून तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी सहकार्य केले. सभापतिपदी ताकसांडे तर उपसभापतिपदी चांभारे वर्धा : येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी भाजपाच्या महानंदा ताकसांडे आणि उपसभापतिपदी अपक्ष सुभाष चांभारे यांची वर्णी लागली. निवडणुकीत सभापतिपदाकरिता भाजपाच्या महानंद ताकसांडे व बसपाच्या कविता कांबळे यांनी नामाकंन दाखल केले. तर बसपाचे भीमा नाकले यांनी माघार घेतली. यावेळी ताकसांडे १६ मते घेत विजयी झाल्या तर कांबळे यांना १२ मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीतही भाजपला कौल हिंगणघाट : पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत ईश्वरचिठ्ठीने भाजपाचे गंगाधर कोल्हे यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी धनंजय रिठे विजयी झाले. या निवडणुकीत भाजपकडे सात सदस्य होते तर विरोधी आघाडीत काँग्रेस ३, राष्ट्रवादी २ ,शिवसेना आणि स्वभप प्रत्येकी १ असे सात सदस्य होते. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सहाय्यक म्हणून गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले, पूणार्नंद मेश्राम यांनी काम पहिले. सभेत दोन्ही बाजूने समान संख्याबळ असल्याने ईश्वरचिठ्ठीने निर्णय घेण्यात आला. ईश्वरचिठ्ठीचे दोनही भाजपच्या बाजूने गेले. यात भाजपचे गंगाधर कोल्हे यांना सभापती तर धनंजय रिठे यांना उपसभापती म्हणून विजयी घोषित करण्यात आले. विरोधी आघाडीच्यावतीने सभापती पदाकरिता राकॉच्या सविता विनोद वानखेडे आणि उपसभापती पदाकरिता काँग्रेसच्या सुवर्णा नामदेव भोयर यांनी अर्ज दाखल केले होते.
आठही पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा
By admin | Published: March 15, 2017 1:38 AM