लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढता अत्याचाराच्या निषेध नोंदविण्यासाठी तसेच समाजातील याच घटकांच्या विविध समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने २५ फेबु्रवारीला वर्धा जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना पाठविलेले नाही. याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. भाजपचा विश्वासघात करणारी शिवसेना कर्जमाफीच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांचीही फसवणूकच करू पाहत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव शासकीय मदतीचे आश्वासन सध्या आश्वासनच ठरत आहे. फडणवीस सरकारच्या काळातील विकासकामांना या महाविकास आघाडीच्या सरकारने स्थगिती देऊन नागरिकांच्या अडचणीत भर टाकली.एकूणच राज्यातील हे सरकार फसवणुकीचे धोरण अवलंबत असल्याचे डॉ. गोडे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी खा. रामदास तडस, नितीन मडावी, अतुल तराळे, किशोर दिघे, मिलिंद भेंडे, विलास कांबळे, अविनाश देव, पवन परियाल उपस्थित होते.जळीत प्रकरणाकडे लक्ष वेधणार- तडसहिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे तसेच विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अद्याप अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याबाबतचे पत्र पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. शिवाय पीडितेच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळालेली नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंगणघाट जळीत प्रकरणासह महिलांवरील वाढण्यात अत्याचाराच्या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे असे खा. रामदास तडस यांनी सांगितले.भाजप आमदार देणार विधानभवनात ठिय्या२५ फेब्रुवारीचे हे आंदोलन राज्यव्यापी आहे. तर २४ फेबु्रवारीला मुंबई येथे बैठक असल्याने जिल्ह्यातील भाजपचे तिन्ही आमदार मुंबई येथे राहतील. असे असले तरी हे तिन्ही आमदार मुुंबईतील विधानभवनासमोर धरणे देऊन राज्य सरकारच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध नोंदविणार असल्याचेही यावेळी डॉ. गोडे यांनी सांगितले.
महिला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाजप देणार धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 6:00 AM
जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना पाठविलेले नाही. याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशिरीष गोडे। २५ फेब्रुवारीला तहसीलसमोर देणार धरणे