वर्धा : लेआऊटच्या व्यवसायात जुने सहकारी असलेल्या व्यक्तीने त्याच्या मित्रांसह दोन चारचाकीने येत व्यक्तीला घेराव घालून लाठ्याकाठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करीत जीव घेण्याचा प्रयत्न केला.
ही घटना १८ रोजी धू्लिवंदनाच्या दिवशी दुपारी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथील वसंत लॉनसमोर घडली. याप्रकरणी हिंगणघाटपोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना बेड्या ठोकल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली. भारत येनुरकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर हिंगणघाट पोलिसांनी आशिष गुलाब पर्बत, प्रदीप ऊर्फ सोनू जसवंत आर्य आणि ताज ऊर्फ ताजू सय्यद मुश्ताक अली यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी भारत येनुरकर याचा लेआऊट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्यासोबत या व्यवसायात हरिष शेंडे, विक्की शाहू, प्रवीण घुरडे हे २०१३ ते २०२१ पर्यंत पार्टनर म्हणून काम करायचे. मात्र, २०१७ मध्ये पैशांच्या कारणातून वाद होऊन आपसी मतभेद निर्माण झाल्याने जखमी भारत येनुरकर हे त्यांच्यापासून वेगळे निघाले. आणि स्वत: प्लॉट खरेदी-विक्रीचे काम करू लागले. त्यांच्यात ८० लाख रुपये किमतीच्या जागेवरून आपसी वाद काही दिवसांपूर्वीपासून सुरू होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
१८ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास भारत येनुरकर आणि त्याचे नातेवाईक शहालंगडी रस्त्यावर असलेल्या वसंत लॉन परिसरात जेवण करीत असताना भारतच्या मोबाईलवर आरोपी हरिष शेंडे याचा फोन आला आणि लॉन बाहेर बोलाविले. भारत लॉन बाहेर गेला असता दोन महागड्या कार लॉनसमोर येऊन थांबल्या आणि कारमधून हरिष शेंडे, विक्की शाहू, प्रवीण घुरडे, आशिष पर्बत, सोनू आर्य आणि ताजू सय्यद अली हे उतरले आरोपींची भारतसोबत शाब्दिक चकमक झाली. तेवढ्यातच सातही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी तसेच डोक्यावर बेसबॉलच्या दंड्याने मारहाण करीत भारत येनुरकर यास गंभीर जखमी करून जीवघेणा हल्ला चढविला आणि तेथून पलायन केले.
रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून असलेल्या भारतला त्याचा पुतण्या अक्षय अशोक कामडी आणि त्याच्या काही मित्रांनी तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. याप्रकरणी त्याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केल्याची माहिती दिली.
अन् पाेलिसांचा फिल्मिस्टाईल पाठलाग....
भारत युनुरकर याला मारहाण केल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी तपासचक्र फिरविले. दरम्यान आरोपी हे तुकडोजी वॉर्ड परिसरात असल्याची माहिती मिळली. पोलीस उपनिरीक्षक अमाेल लगड, विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले हे वाहनाने दाखल झाले असता तिन्ही आरोपी एम. एच. १३ सी. पी. ५५५५ क्रमांकाच्या कारने पलायन करीत असल्याचे दिसले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून आरोपीची धरपकड करून त्यांना अटक केली.