वर्ध्यात राजकीय खळबळ, भाजप जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 12:37 PM2021-11-15T12:37:48+5:302021-11-15T12:47:24+5:30
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते.
वर्धा : वर्ध्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष गोडे यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे जिल्हाध्यक्ष पदावर असताना त्यांनी भाजपला हा धक्का दिला.
वर्ध्याचे भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून गोडे भाजपच्या कार्यप्रणालीवरून अस्वस्थ होते. भाजपची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे नाराजीही व्यक्त केली होती. अखेर आज सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्या उपस्थितीत त्यांनी करंजी (भोगे ) येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील, पालकमंत्री सुनिल केदार, चारुलता टोकस, शेखर शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपची शेतकरी विरोधी भूमिका आणि वाढती महागाई यावरून त्यांनी घुसमट होत असल्याची भावना व्यक्त केली होती. अखेर आज त्यांनी राजीनामा दिलाच. गोडे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेसचं बळ वाढलं आहे.