पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह : पक्षाची तिकीट न मिळाल्याने दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी वर्धा : सत्ता ही समाजकारणासाठी, या बाबीला हरताळ फासला जात असल्याचे नामांकन दाखल केलेल्या काही उमेदवारांवरून दिसून येते. पक्षनिष्ठेच्या नावावर एका पक्षाकडे उमेदवारी मागायची आणि पक्षाने तिकीट नाकारल्यास दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधले जायचे, याचा प्रत्यय या निवडणुकीत काही उमेदवारांच्या नावावरून लक्षात येते. दरम्यानच्या काळात ‘एकाच इच्छुकाचा अनेक पक्षाच्या उमेदवारीवर डोळा’, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच प्रकाशित केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. वर्धा तालुक्यातील पिंपरी (मेघे) गटासाठी संजय शिंदे यांनी भाजपकडे तिकीट मागितली होती; मात्र भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठेतेचा मुद्दा पुढे रेटला. यामुळे संजय शिंदे यांची जवसपास निश्चित झालेली तिकीट कापून प्रशांत इंगळे तिगावकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. पक्षश्रेष्ठींनी तिकीट न दिल्याने संजय शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली. यामुळे येथे पक्षनिष्ठा खुंटीला टांगली गेली. सत्तेसाठी सर्वकाही, याचा येथे प्रत्यय भाजपला येत आहे. सिंदी (मेघे) जि.प. मतदार संघातही हाच प्रकार बघायला मिळतो. प्रदीप मस्के यांनी भाजपची तिकीट मागितली होती; मात्र त्यांना पक्षाने तिकीट न दिल्याने त्यांनी स्वत:ला शिवसेनेच्या दावणीला बांधले आहे. याच मतदार संघातून सिद्धार्थ सवाई यांनीही भाजपकडे उमेदवारी मागितली होती. त्यांनीही भाजपची तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली आहे. बोरगाव (मेघे) जि.प. मतदार संघासाठी प्रभाकर बोटकुले यांनी भाजपकडे तिकीट मागितली होती; पण भाजपने पक्षातील लोकांना डावलून बाहेरच्या व्यक्तीला तिकीट दिली. बोटकुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळवून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. सावंगी (मेघे) जि.प. मतदार संघात विलास दौड यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी आकाश-पाताळ एक केले होते; मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनीही पक्षनिष्ठा बाजूला ठेवून काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक मैदानात उडी घेतली आहे. या उमेदवारांना पक्षांनी तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडाचा झेंडा हातात घेत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली असती तर ती समजण्यासारखी होती; मात्र दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात उडी घेतल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दलच संभ्रम निर्माण झाला आहे. सत्तेसाठी ही मंडळी क्षणात उड्या मारत असेल तर निवडून आल्यानंतर ते खरोखर जनतेचे राहणार काय, असा प्रश्नही मतदार उपस्थित करू लागले आहेत.(जिल्हा प्रतिनिधी) भाजपला तालुका उपाध्यक्षाकडून घरचा अहेर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेनेला बंडाळीची लागण झाली नसली तरी भाजपला मात्र अनेक ठिकाणी या बंडोबांमुळे डोकेदुखीचा सामना करावा लागणार आहे. काहींनी दुसऱ्या पक्षाकडे धाव घेतली तर काहींनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. वर्धा तालुक्यातील बोरगाव (मेघे) येथून भाजपचे तालुका उपाध्यक्ष गणेश इखार यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
भाजपने नाकारलेले काँग्रेस, राकाँ व शिवसेनेच्या दावणीला
By admin | Published: February 04, 2017 12:29 AM