बाबाराव अंबुलकर कन्नमवारग्राम कन्नमवारग्राम हा जिल्हा परिषद मतदार संघ खुल्या गटातील महिलेसाठी राखीव झाला आहे. कुंडी पंचायत मतदार संघ महिला खुला तर तर कन्नमवारग्राम पं.स. गण अनु. जातीकरिता राखीव आहे. या मतदार संघामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघातून निवडून गेलेले उमेदवार जिल्हास्थळी सभापतीही झाले. तीन माजी सभापती कन्नमवारग्रामचे रहिवासी होते. पाच वर्षांपूर्वी झालेली जि.प. निवडणूक अटीतटीची झाली होती. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मारोतराव व्यवहारे यांना निसटता विजय मिळाला होता. त्यावेळी भाजपकडून मिठालाल चोपडे व राष्ट्रवादीकडून विजय गाखरे, हे रिंगणात होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारीची धुरा माजी सभापती प्रवीण गांधी यांनी सांभाळली होते. यामुळे १०० मतांनी उमेदवार पराभूत झाला; पण आता या मतदार संघातील विजय गाखरे यांनी भाजपात प्रवेश घेऊन पत्नीसाठी पक्षाकडून उमेदवारी प्राप्त केली आहे. मागील निवडणुकीत काँगे्रसचे एकनिष्ठ मारोतराव व्यवहारे यांच्या पत्नीला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. या दोन्ही उमेदवारांसह इतर पक्षाचे व अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत; पण खरी लढत भाजपच्या जि.प. गटाच्या उमेदवार सारिका विजय गाखरे व काँग्रेसचे विद्यमान सदस्य मारोतराव व्यवहारे यांच्या पत्नी निलीमा मारोतराव व्यवहारे यांच्यातच रंगणार आहे. पंचायत समिती मतदार संघातील कुंडी गणामधून नव्यानेच लढत असलेल्या भाजपच्या ज्योत्सना दिनेश ढोबाळे या रिंगणात आहेत. काँग्रेसच्यावतीने रेखा डोंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कन्नमवारग्राम पं.स. गणाकरिता भाजपतर्फे आम्रपाली मुकेश बागडे तर काँग्रेसतर्फे इंदिरा सुनील गजभिये तथा अपक्ष मंदा वासुदेव मेश्राम यांच्यातच लढत रंगणार आहे. असे असले तरी मतदार मात्र संभ्रमात आहे. या निवडणुकीत कन्नमवारग्राम मतदार संघात सर्वच पक्षांनी उमेदवारी नाकारलेल्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नवीन कार्यकर्त्यांमुळे भाजपात कलह माजलेला आहेत. काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सूर नसला तरी उमेदवारांबद्दल नकारात्मकता दिसून येत आहे; पण काँग्रेस पक्षाच्या नेहमीच्या परंपरेनुसार शेवटच्या क्षणी सर्वच कार्यकर्ते एकच काम करतील , अशी सर्वांची अपेक्षा आहे. आज भाजपातील धूसफुस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी कुणाला मारक ठरणार, हे चित्र काहीच दिवसांत स्पष्ट होणार आहे.
भाजपात धुसफूस तर काँगे्रस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा आलाप
By admin | Published: February 05, 2017 12:41 AM