लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता परंतु सन २०१४ च्या मोदी लाटेपासून हा बालेकिल्ला खिळखिळा करण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांपैकी देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला कायम होता. अखेर या निवडणुकीत चारही विधानसभा मतदारसंघांत भाजपने मैदान मारून गांधी जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुफड़ा साफ केला.
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांतून ६० मतदारांनी रिंगणात दंड थोपटले होते. यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १८, देवळी विधानसभा मतदारसंघात १४, हिंगणघाट मतदारसंघात १२ तर वर्धा विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात होते. जिल्ह्यातील एकूण ११ लाख २८ हजार ३९२ मतदारांपैकी तब्बल ६९.२९ टक्के म्हणजे ७ लाख ८४ हजार ५५५ मतदारांनी हक्क बजावला होता, सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ७.५३ टक्के मतदानाची वाढ झाली होती. त्यामुळे वर्धा आणि देवळी मतदारसंघात अपक्ष उमेदवारांचे कडवे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता वर्तविली जात होती. इतकेच नाही तर वाढलेला मतदानाचा टक्का कुणाला धक्का आणि कुणाला सत्ता देईल याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीत धाकधूक वाढली होती. अखेर शनिवारी सकाळपासून मतमोजणी सुरू होताच सुरुवातीपासूनच महायुतीलाच मतदारांनी कौल देताच सर्वत्र जल्लोषाला सुरुवात करण्यात आली. दुपारी तीनवाजेपर्यंत जवळपास चारही मतदारसंघांतील चित्र स्पष्ट व्हायला लागले. महायुतीच्या म्हणजेच भाजपच्या चारही विधानसभा मतदारसंघांत भाजपचे कमळ फुलल्याने एकच उत्साह संचारला होता.
चारही मतदारसंघांत दुहेरी लढत राहिली असून इतरांना आपले डिपॉझिटही वाचविता आले नसल्याचे चित्र आहे. निकाल हाती येताच विजयाची तयारी सुरू झाली आणि नवनियुक्त आमदारांची शहरातून मिरवणूकही काढण्यात आली. वर्ध्यात डॉ. पंकज भोयर यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याने भाजपात मोठा उत्साह दिसून आला. तसेच हिंगणघाटमध्येही समीर कुणावार यांनी हॅटट्रिक करुन ऐतिहासिक विजय मिळविल्याने शहरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय आर्वीमध्ये नवख्या चेहऱ्याला संधी दिल्यानंतरही मतदारांनी विजयश्री खेचून आणत येथेही सलग दोनदा भाजपला निवडून देण्याचा इतिहास घडविला. त्यामुळे चक्का जेसीबीतून गुलालाची उधळण करण्यात आली, देवळी मतदार संघात पहिल्यांदाच राजेश बकाने यांच्या माध्यमातून भाजपचे कमळ फुलल्याने चारही मतदार संघात ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे.
हा माझाच नाही तर सर्वच मतदारांचा विजय आहे... "देशातील आणि राज्यातील सरकारने सर्वसामान्यांच्या हिताकरिता विविध योजना राबविल्या. त्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम करण्यात आले. वर्धा आणि सेलू तालुक्यात विकासाची गंगा पोहोचविण्यात कोणतीही कसर सोडली नाही. परिणामी याचा परतावा लाभार्थ्यांनी मतदानरूपी आशीर्वादातून दिला आहे. आजचा हा ऐतिहासिक विजय केवळ महायुती किंवा भाजपचा नसून माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदाराजांचा आहे." - डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.
विजयाची कारणे वर्धा विधानसभा मतदार संघात डॉ. पंकज भोयर • यांनी गेल्या दहा वर्षात विकास कामांचा झंझावात चालविला होता. त्यामुळे त्याला मतदारांनी साथ दिली. मतदार संघातील बसस्थानक, शासकीय इमारती व आरोग्य केंद्राचे रुपडे पालटविले. इतकेच नाही तर आदिवासी प्रकल्प कार्यालयही लाभाचे ठरले. बचत गटांच्या महिलांची चळवळ गतीमान व्हावी • यासाठी बचत भवनाची निर्मिती केली. त्यामुळे महिलां भगिणींनीही त्यांना मतदानातून विजयाचा मार्ग सकर झाला आहे.
आर्वीतील सुज्ञ मतदारांनी सेवा करण्याची संधी दिली "आर्वी विधानसभा मतदारसंघाचा कालापालट करण्याचा संकल्प घेऊन राजकीय प्रवासाला सुरुवात केली. या मतदारसंघात सिंचनासह एमआयडीसी, रुग्णालय आदी प्रश्न निकाली काढले. या काळात काही अडचणीही उभ्या ठाकल्या, तरीही मतदारांनी डोक्यावर घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय खेचून आणला. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुजाण मतदारांनी या मतदारसंघाचा विकास करण्याची एक संधी दिली आहे. त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही." - सुमित वानखेडे, आमदार, आर्वी
विजयाची कारणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक असल्याने सुमित वानखेडे यांच्याकडे लोकसभा निवडणूक प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली. आर्वीपूत्र असल्याने त्यांनी मतदारसंघात गेल्या दीड वर्षात अनेक विकास कामे खेचून आणली. बेरोजगारांकरिता एमआयडीसी, शेतकऱ्यांकरिता सिंचनाची व्यवस्था करणारा प्रकल्प आणला. याशिवाय तरुण तडफदार आमदार म्हणूनही ख्याती मिळाल्याने त्यांना सहज विजय मिळवता आला.
या जनआर्शीवादाने आता माझी जबाबदारीही वाढली "हिंगणघाट मतदारसंघातील मतदारांनी नेहमीच मला अडचणीच्या काळात साथ देऊन आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून देत सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे या मतदारसंघात प्रामाणिकपणे विकास कामावर भर देऊन मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला. अजूनही बहुतांश कामे बाकी असून ती पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी पुन्हा मतदारांनी माझ्यावर सोपविली. आजच्या या जनाआशीर्वादाचा मी नम्रपणे स्वीकार करून सर्म मतदारांना नमन करतो." - समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट
विजयाची कारणे हिंगणघाट मतदारसंघाने आजपर्यंत कुणालाही तिसऱ्यांदा संधी दिली नाही. पण, विकासाच्या झंझावातामुळे समीर कुणावार यांनी इतिहास घडविला. आ. कुणावार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न असोत वा • मतदार संघातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न असो, विधानसभेत लावून धरत सरकारचे लक्ष वेधले. सरकारनेही विश्वास टाकून त्यांना विधानसभेचे तालिकाध्यक्ष बनविले. हा त्यांचा प्रामाणिक चेहरा मतदारांना भावल्याने पुन्हा आमदार म्हणून संधी दिली.
पहिल्यांदा मतदारांनी मतदार संघात इतिहास घडविला "देवळी विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. याला मतदारही चांगलेच कंटाळले होते. मतदारांनी गेल्या निवडणुकीतही मोठा आधार दिला होता पण, आमदार होता आले नाही. अखेर मतदारांनी मला आमदार करण्याची खुणगाठ मनाशी बांधली आणि भरभरून मताचे दान करून मला आमदार बनविले, पहिल्यांदा या मतदारसंघात भाजपला संधी मिळाल्याने मतदारांचा विश्वास सार्थकी लावणार, या विजयाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार." - राजेश बकाने, आमदार, देवळ
विजयाची कारणे देवळी मतदारसंघात गेल्या २५ वर्षापासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती. ही राजकीय 'दादा गिरी मतदारांनाही पसंत पडली नाही. त्यामुळे या मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाव भाजपने मोठी ताकद एकवटून मतदारसंघ पिंजून काढत काँग्रेसच्या आमदाराला घाम फोडला. यात मतदारांनी भगघोस साथ दिल्याने आणि लाकडी बहीणही धावून आल्यामुळे मतदार संघा पहिल्यांदा परिवर्तन घडविणे शक्य झाले.