राजू बकाने : प्राप्त समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा वर्धा : आगामी जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने जिल्ह्यात कार्यकर्ता संवाद यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचा शनिवारी येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात समारोप करण्यात आला. याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. सदस्य राणा रणनवरे, महामंत्री अविनाश देव व सुनील गफाट, न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, जिल्हा संपर्क प्रमुख राहुल चोपडा व सहसंयोजक राहुल करंडे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. बकाने म्हणाले, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि कार्यकर्त्यांमधील दुरावा दूर करण्यासाठी ही संवाद यात्रा जिल्हा भाजपच्यावतीने काढण्यात आली. या यात्रेला पुलगाव येथून २१ जुलै रोजी प्रारंभ झाला. यानंतर देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी(रेल्वे) , सेलू असा प्रवास करीत ती आज वर्धेत पोहचली. यामध्यमातून संघटनात्मक बांधणी, नगर परिषद निवडणुकांसदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधून तयारीच्या दृष्टीने विचारविमर्श करण्यात आला. यासोबतच त्या त्या भागातल्या समस्यांची नोंद घेण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यामार्फत प्रयत्न केले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यासोबतच शासनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी केवळ कामे प्रस्तावितच केलेली नाही, तर विविध तालुका, नगर पालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी निधीची तरदूतही करण्यात आली आहे. याचीही माहिती कार्यकर्त्यांना दिली, असेही बकाने म्हणाले. खा. तडस म्हणाले, सिंदी(रेल्वे) व वर्धा येथील उड्डाण पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. आ. डॉ. भोयर म्हणाले, वर्धा लगतच्या ११ गावांचा मुद्दा भाजप सरकारच्या काळात मार्गी लागला. घर बांधकामाचे ९६९ प्रस्ताव नगर रचनाकाराकडे प्राप्त असून पैकी २५९ प्रस्तावांना मंजुरीही मिळालेली आहे. या कामाला आता गती येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या यात्रेत जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या नेतृत्वात जिल्हा सरचिटणीस किशोर दिघे, अविनाश देव, राहुल चोपडा, बाळा जगताप, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना वानखेडे, गुड्ड कावळे. अ.ज. आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन मडावी, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयंत येरावार, सरचिटणीस जगदीश संचारिया, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्ता महाजन, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुरकार, शिक्षण आघाडीचे मोहिते व पदाधिकारी सहभागी झाले होते.(जिल्हा प्रतिनिधी)
भाजपच्या कार्यकर्ता संवाद यात्रेचा समारोप
By admin | Published: July 24, 2016 12:18 AM