हिंगणघाट (वर्धा) : भाजपची ओबीसी जागर यात्रा विदर्भातील ९ लोकसभा क्षेत्रातून जात ओबीसींसाठीच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा जागर करणार आहे. सोमवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी विदर्भातील वर्धा जिल्ह्यातून या यात्रेचा शुभारंभ झाला. पारडी (नगाजी) येथून निघालेली यात्रा हिंगणघाटात पोहोचली. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संगमलाल गुप्ता, आमदार समीर कुणावार, माजी आमदार आशिष देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचे क्रेनद्वारे तीस फूट लांबीचा हार अर्पण करून स्वागत करण्यात आले.
शेतकऱ्यांचे हित साधले जावे, युवकांना रोजगार मिळावा, महिलांचे कल्याण व्हावे आणि ओबीसीमध्ये सहभागी असणाऱ्या १८ पगड जाती, १२ बलुतेदार व ३५० हून अधिक उपजातींना न्याय मिळवून देण्याचे काम जागर यात्रा करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही ओबीसी समाजाचा डेटा तयार करण्याची मागणी राज्य शासनाकडे करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आमदार बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सुवर्ण व्यावसायिक सुभाष निनावे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला.
निखाडे भवनात आयोजित कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, खासदार रामदास तडस, विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार डॉ. रामदास आंबटकर, जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, डॉ. उषाकिरण थुटे, शहराध्यक्ष भूषण पिसे, अनिता माळवे, अर्चना वानखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर दिघे यांनी केले. आभार सुनील गफाट यांनी मानले.
सोयाबीन उत्पादकांना मदतीची मागणी
आमदार समीर कुणावार यांनी सोयाबीन उत्पादकांची व्यथा मांडून पिवळ्या रोगामुळे ८० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हातून गेलेले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांना तातडीने मदत देण्याची गरज असून, शासनाने सोयाबीन उत्पादकांना पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली.