शिक्षण सभापतीची निवड आज : रात्री उशिरापर्यंत उमेदवारासाठी माथापच्चीवर्धा : मिलिंद भेंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदासाठी भाजपमधील इच्छुकांचा दावा कायम असल्यामुळे कोणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ घालावी, यावर एकमत होत नसल्यामुळे भाजप नेत्यांची चांगलीच कोंडी झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत उमेदवार निश्चित करण्यासाठी चांगलीच माथापच्ची सुरू होती. भाजपने आपल्या सदस्यांसह सत्ता गटातील २५ सदस्यांना पेंच प्रकल्प येथे सहलीला नेले आहे. या ठिकाणी नवा सभापती कोण असणार, यावर निर्णय घेणार असल्याचे सूत्राचे म्हणणे होते. अविनाश देव आणि वसंत आंबटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. परंतु माधुरी चंदनखेडे यांनी पदासाठीचा आपला हट्ट कायम ठेवल्याने भाजपची चांगलीच अडचण झाल्याची माहिती आहे. हा तिढा सोडविण्यासाठी मंगळवारी रात्री ८ वाजता भाजपच्या नेतेमंडळींनी सर्व सदस्यांची बैठक बोलाविल्याची माहिती आहे. या बैठकीत एका नावावर सर्व सदस्यांत एकमत होत नसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सभापती पदाचा उमेदवार ठरला नव्हता. परंतु वसंत आंबटकर वा अविनाश देव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहे. यामुळे नवा शिक्षण सभापती आंबटकर वा देव याची उकल निवडीपूर्वी होण्याची शक्यता आहे. बहुमत भाजपकडे असल्याची माहितीही सूत्राने दिली. काँग्रेस व राष्ट्रवादी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
सदस्यांच्या इच्छेपुढे भाजपची कोंडी
By admin | Published: April 06, 2016 2:19 AM