वर्धा : वर्धा येथून प्रवासी घेऊन जामच्या दिशेने जात असलेल्या काळीपिवळीने वर्धेच्या दिशेने येत असलेल्या ट्रकला समोरासमोर धडक दिली. यात काळीपिवळीमधील तब्बल १७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वर्धा-शेडगाव मार्गावरील मदनी (दिंदोडा) शिवारात पॉवर हाऊसजवळ झाला.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा वाहनात भरणा करून एम. एच. ३२ बी. ०६३१ क्रमांकाची काळीपिवळी वर्धा येथून जामच्या दिशेने जात होती. तर, एम.एच. २९ टी. १८८१ क्रमांकाचा ट्रक वर्धेच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहने मदनी (दिंदोडा) शिवारातील पॉवर हाऊसजवळ येताच काळीपिवळीने ट्रकला धडक दिली. यात कांचन सचिन भुजभंड, राजू राजगुरे, लीला रामाजी लोणारे, रमेश गोड, नम्रता राजेंद्र कांबळे, सुनीता दिगांबर चौधरी, कार्तिक आनंद बनियात, अनिता आनंद बनियात, संध्या झामरे, हाफिज अहमद खान, वंदन दौड, रामा विठ्ठल गोणाडे, धनाजी वसे, मंगेश जांबुणकर, शंकर श्यामराव गिरडकर, चंदा सुभाष कुमरे, विसर्जन नामक व्यक्ती हे जखमी झाले. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.
जखमी सेवाग्रामच्या रुग्णालयात
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे रवाना केले. या जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
अन् पोलिसांनी गाठले घटनास्थळ
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सेवाग्रामचे ठाणेदार नीलेश ब्राह्मणे, पोलीस कर्मचारी महेश काटकर, आशिष लाड, प्रकाश लसुंते, सुनील पाऊलझाडे, राजू शंभरकर, नीलेश नेहारे, उईके यांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत पंचनामा केला.