वर्धा : रेशन दुकानात वापरण्यात येणारा शासकीय तांदूळ विना परवाना गोदामातून मालवाहू वाहनात भरुन वाहतूक करीत असताना पोलिसांनी दोघांना अटक करुन तांदळाचा काळाबाजार उद्धवस्त केला. ही कारवाई कोल्ही शिवारात समुद्रपूर पोलिसांनी १७ रोजी केली. श्रीकांत प्रभाकर शिंगरु (२६) रा. हिंगणघाट, अंकित धर्मेंद्र कराडे (२६) रा. वाकधरा ता. वणी जि. यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, समुद्रपूर पोलिसांचे पथक अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी खासगी वाहनाने जात असताना कोल्ही शिवारातील गोदामातून शासकीय तांदळाचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ कोल्ही शिवार गाठून वामण भाईमारे यांच्या शेतातील गोदामात छापा मारला असता एम.एच. ३४टी. १३४५ क्रमांकाचा मालवाहू गोदाम परिसरात उभा दिसला. पोलिसांनी चालकास ताब्यात घेत मालवाहूची पाहणी केली असता यात रेशनच्या तांदळाचे १४६ कट्टे आढळून आले. पोलिसांनी चालक व क्लिनरला परवान्याची विचारणा केली असता चालकाने कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले.
रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार करीत असल्याचे उजेडात येताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून मालवाहू वाहनासह तांदळाचे पोते असा एकूण १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक प्रेमराज अवचट यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत काळे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.