रवींद्र चांदेकर
वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघातील तब्बल पाच विधानसभा मतदारसंघांनी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांना साथ दिली. प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना केवळ एकाच विधानसभेत आघाडी घेता आली. त्यामुळे त्यांची हॅट् ट्रिक चुकली. पाच मतदारसंघांत काळे वरचढ ठरल्याने ते लोकसभेत पोहोचले, तर तडस यांचे तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंगले. वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी आणि धामणगाव (रेल्वे) या पाच विधानसभा मतदारसंघांत अमर काळे यांना आघाडी मिळाली. केवळ मोर्शी विधानसभेतील जनतेने तडस यांना पसंती दर्शविल्याचे दिसून येत आहे. काळे यांना आघाडी मिळालेल्या पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघांत भाजपचे, तर एका मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहे. तडस यांना आघाडी दिलेल्या मोर्शी विधानसभेत अपक्ष (स्वाभिमानी शेतकरी संघटना) आमदार आहे. अमर शरदराव काळे यांना एकूण ५ लाख ३३ हजार १०६, तर रामदास चंद्रभान तडस यांना ४ लाख ५१ हजार ४५८ मते मिळाली. काळे ८१ हजार ६६८ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहे. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
काळे यांना धामणगाव विधानसभा मतदारसंघात ९१ हजार ६३३, तर तडस यांना ७७ हजार ४१० मते मिळाली. काळे यांनी येथे १४ हजार २२३ मतांची आघाडी घेतली. मोर्शी विधानसभेत काळे यांना ७४ हजार ७०६, तर तडस यांना ८९ हजार ९६८ मते मिळाली. या एकमेव विधानसभेत तडस यांना १५ हजार २६२ मतांची आघाडी मिळाली. अमर काळे यांचा गृह विधानसभा मतदारसंघ असलेल्या आर्वीत त्यांना ९१ हजार ८८९, तर तडस यांना ७१ हजार ९३४ मते मिळाली. आर्वीत काळे यांना १९ हजार ९५५ मतांची लीड मिळाली आहे.
रामदास तडस यांचा गृह मतदारसंघ असलेल्या देवळीत काळे यांना ९३ हजार ६०९, तर तडस यांना ६१ हजार ५८७ मते मिळाली. देवळीत काळे यांना तब्बल ३२ हजार २२ मतांची आघाडी मिळाली. हिंगणघाट विधानसभेत काळे यांना ९५ हजार ३५, तर तडस यांना ७४ हजार ४८० मते मिळाली. येथे काळे यांना २० हजार ५५ मतांची आघाडी मिळाली आहे. वर्धा विधानसभेत काळे यांना ८३ हजार ८८९, तर तडस यांना ७४ हजार २२० मते मिळाली. या मतदारसंघात काळे यांना ९ हजार ६६९ मतांची आघाडी मिळाली. काळे यांना पाच विधानसभा मतदारसंघांनी आघाडी दिल्याने त्यांचा विजय सुकर झाला. याउलट तडस यांना भाजपचे आमदार नसलेल्या केवळ एकाच मोर्शी विधानसभेने आघाडी दिल्याने त्यांचे तिसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंग पावले.
बसपा, वंचित तिसऱ्या, चौथ्या स्थानी
लोकसभेच्या रिंगणात अमर काळे आणि रामदास तडस यांच्याशिवाय इतर २२ उमेदवार होते. त्यात ‘बसपा’चे डॉ. मोहन राईकवार २० हजार ७९५ मते घेऊन तिसऱ्या, तर ‘वंचित’चे प्रा. राजेंद्र साळुंखे १५ हजार ४९२ मते घेऊन चौथ्या स्थानी राहिले. अपक्ष उमेदवार आसीफ यांनी १५ हजार १८२, तर किशाेर पवार यांनी १२ हजार ९२० मते घेतली. इतर सर्व उमेदवारांना १० हजारांच्या आत मते मिळाली आहे. त्यात रामदास तडस यांच्या स्नुषा पूजा पंकज तडस यांना २ हजार १३५ मते मिळाली आहे.देवळीत सर्वाधिक, तर वर्धेत सर्वांत कमी मताधिक्य
अमर काळे यांना देवळी विधानसभेत सर्वाधिक ३२ हजार २२ मतांचे मताधिक्य आहे. तेथे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी काळे यांच्यासाठी प्रचंड परिश्रम घेतल्याचे निकालावरून दिसून येत आहे. वर्धेत भाजपचे डॉ. पंकज भोयर हे आमदार आहे. त्यांनी रामदास तडस यांच्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे काळे यांना केवळ ९ हजार ६६९ मताधिक्य मिळू शकले. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या विधानसभेत विरोधी उमेदवाराला सर्वात कमी मताधिक्य मिळाले आहे. याउलट भाजपचे आमदार असलेल्या समीर कुणावार यांच्या हिंगणघाट, दादाराव केचे यांच्या आर्वी आणि प्रताप अडसड यांच्या धामणगाव विधानसभेत काळे यांनी १४ हजार मतांच्यावर आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.