लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : श्रीक्षेत्र महाकाळी येथील मंदिरावर राज्यातील भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या परिसराला शासनाने ‘क’ पर्यटनस्थळ जाहीर केले आहे. पण, याच मंदिर परिसरात भाविकांना प्राथमिक सोयी-सुविधा मिळेल अशी काही समाजहिताची कामे केली असता त्यावर वर्धा पाटबंधारे विभागाच्या वतीने अतिक्रमणाचा ठपका ठेवला जात आहे. तर त्या व्यक्तीने शासनाची दिशाभूल करून नवीन सुरक्षा भिंत बांधून पांदण रस्ताच अरुंद केला, त्याला वर्धा पाटबंधारे विभागाच्या वतीने अभय दिले जात असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आयोजित पत्रपरिषदेतून केली आहे.शंकरप्रसाद अग्निहोत्री पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी ११ सप्टेंबर २०९० च्या पत्राद्वारे महाकाळी येथील नवरात्री उत्सवाची संपूर्ण जबाबदारी जय महाकाली सेवा मंडळाकडे दिली आहे. तर, सहा. मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग नागपूर यांनी प्रधान सचिव पाटबंधारे विभाग मुंबई यांना दिलेल्या १७ ऑगस्ट १९९३ च्या पत्राद्वारे आवश्यकतेपेक्षा जास्त असलेली जमीन, तसेच सदर जमीन जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने तहसीलदारांमार्फत जय महाकाली सेवा मंडळाला देण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्धा यांनी २९ मार्च २०९४ ला दिलेले पत्रान्वये धाम जलायशामुळे प्रकल्पबाधित झालेल्या मासोद या गावाच्या पुनर्वसित गावठाण भागात बांधण्यात आलेल्या महाकाली मंदिराचा ताबा सेवा मंडळाला देण्याचे निश्चित केले आहे. पण, दुर्लक्षित धोरणांमुळे या मंदिराची दैनावस्था होत आहे. तर, आता महाकाली सेवा मंडळाच्या वतीने पांदण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करीत त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना ऊन, पावसापासून बचाव व्हावा या हेतूने मंदिर मार्गावर टिनाचे शेड बांधण्यात आले आहे. पण, याच समाजोपयोगी कामावर अतिक्रमणाचा ठपका वर्धा पाटबंधारे विभागाच्या वतीने ठेवण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्यांची कुचंबणा होऊ नये म्हणून महिला-पुरुषांसाठी वेगवेगळे स्वच्छतागृहही बांधण्यात आले आहे. पण, विकासकामांना हेतुपूर्वक विरोध केला जात आहे. तर ज्या व्यक्तीने शासनाची दिशाभूल करून मंदिराकडे येणारा पांदण रस्ता अरुंद होईल या उद्देशानेच जुन्या सुरक्षा भिंतीला डावलत नवीन सुरक्षा भिंत बांधली त्याला पाटबंधारे विभागाकडून अभय दिले जात असल्याचे याप्रसंगी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले.
आम्ही सुरू असलेले काम थांबविण्यासाठी नोटीस बजावली. पण त्याला बगल दिल्याने अखेर आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आम्ही शासकीय नियमांना अनुसरून काम करीत आहोत. शासकीय नियमांना डावलणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही होईलच.- जलेश सिंग, सहा. कार्यकारी अभियंता, वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा.