वर्धा : पुलगाव हद्दीत येणाऱ्या वायफड रस्त्यावर नाकाबंदी केली असता पोलिसांनी चारचाकी वाहनासह देशी विदेशी दारुसाठा पकडला. पोलिसांनी कारसह एकूण ७ लाख ७ हजार १०० रुपयांचा दारुसाठा जप्त करुन एका आरोपीस अटक केली. तर बार मालकाविरुद्धही गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पुलगाव पथकाने केली.
मनोज उर्फ बंटी गंगाधर काठाणे (३१) रा. वायफड असे अटक केलेल्याचे नाव आहे तर लकी बारचा मालक राजू जैस्वाल रा. सावंगी मेघे हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पुलगाव येथील पथक पुलगाव हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी रवाना झाले होते. गोपनीय माहितीनुसार वायफड रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली असता एम.एच. ०२ जेपी. ९९६० क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारुसाठा मिळून आला. पोलिसांनी दारुसाठा जप्त केला. दारुसाठा अमरावती जिल्ह्यातील लकी बार येथील राजू जैस्वाल याच्या बारमधून आणल्याची माहिती पोलिसांना त्याने दिली. यावरुन पोलिसांनी राजू जैस्वाल याच्याविरुद्धही पुलगाव पोलिसात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, सुभाष राऊत, अवी बन्सोड, संजय राठोड, अमोल ढोबाळे यांनी केली.