शेतकरी अडचणीत : कंपन्यांचे पावसाकडे बोटवर्धा : पावसाच्या दडीने जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अनेकांना मोड आली आहे. जिल्ह्यीत मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे विकल्या गेली आहेत. अशात मोड आलेली बियाणे कंपन्या बोगस ठरवित असून शेतकऱ्यांना कुठलीही मदत देत नाहीत. यामुळे पावसाने मारलेली दडी बोगस बियाणे विकणाऱ्यांना साथ देत असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.यंदाच्या हंंगामात बोगस बियाणे बाजारात येणार अशी शंका कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना त्याची उगवण क्षमता तपासण्याची सूचना करण्यात आली होती. जिल्ह्यात तीन ठिकाणी कृषी विभागाने केलेल्या कारवाईतून कपाशीची बोगस बियाणे विकल्या जात असल्याचे समोर आले. कारवाई होण्यापूर्वी ही बियाणे बाजारात विकली गेली आहे. याचाच फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकरी गावात बियाणे विकण्याकरिता येत असलेल्या कंपनीच्या लोकांना या बाबत विचारत आहेत; मात्र ते पावसाचे कारण सांगत आहेत. बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह आणि पावसाचा हा लहरीपणा या दोन्ही पेचात शेतकरी सापडला आहे. नेमका दोष कुणाला द्यावा असा प्रश्न त्याला पडला आहे. (शहर प्रतिनिधी)
बोगस बियाण्यांना पावसाच्या दडीची साथ
By admin | Published: June 30, 2014 12:01 AM