वर्धा : वर्ध्यातील म्हसाळा परिसरात असलेल्या बोगस बियाणे बनविणाऱ्या कारखान्याचा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पर्दाफाश केला असून विविध नामांकित कंपन्यांच्या पाकिटात रॅपिंग केलेला २९ टन बोगस बियाणांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी एका आयशर ट्रकसह चार वाहने व इतर साहित्य असा एकूण १ कोटी ५५ लाख ८३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी १५ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये विजय अरुण बोरकर (३७, रा. हमदापूर), राजकुमार यादव वडमे (३९, रा. रेहकी), हरिशचंद्र उईके (१८, रा. ऐजोसी जि. जौनपूर उत्तर प्रदेश), धरमसिंग बंरीहार यादव (२७, रा. उत्तर प्रदेश), गजानन सूर्यभान बोरकर (४५, रा. हमदापूर), सुदामा शिवा सोमकुवर (२७, रा. लास जि. छिंदवाडा), अमन शेषराव धुर्वे (१८, रा. लास, जि. छिंदवाडा), महमूद गफ्फार चव्हाण (४५, रा. तिवरंग जि. यवतमाळ) यांचा समावेश आहे. तर गजू बोरकर (रा. सेलू), प्रवीण (रा. वरोरा, चंद्रपूर), वैभव भोंग्र (रा. अमरावती), पंकज जगताप (रा. अमरावती), गजभिये (क्रिस्टल कंपनी नागपूर), गजू ठाकरे (रा. कारला रोड), शुभम बेद (रा. वर्धा) यांचा शोध पोलिस घेत आहेत.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू सुभाष जयस्वाल (३८, रा. रेहकी ता. सेलू) हा मुख्य सूत्रधार असून तो इतर आरोपींच्या मदतीने कापसाचे बोगस बियाणे पॅकिंग व लेबलिंग करून वितरित करीत होता. म्हसाळा परिसरातील कारखान्यात बोगस बियाणांसोबतच सिलिंग पॅकिंग साहित्य, बियाणे निर्मितीसाठी लागणारे साहित्य मिळाले. गुजरात येथील अहमदाबाद जिल्ह्यातील ईडर येथील रहिवासी राजूभाई आणि महेंद्रभाई (रा. दारामली गुजरात) यांच्याकडून १२ जून रोजी प्रत्येकी ७ टन प्रमाणे एकूण १४ टन बनावट बियाणे बोलाविले होते. सिलिंग व लेबलिंगसाठी लागणाऱ्या कापसाच्या बियाणांची पाकिटे आरोपी गजू बोरकर, विजय बोरकर, प्रवीण, वैभव भोंगे, पंकज जगताप, गजभिये, शुभम बेद यांच्याकडून आणली होते. आरोपी राजू जयस्वाल व गुजरात येथील बोगस बियाणे पुरवठा करणारे आरोपी यांची देवाणघेवाण गजू ठाकरे (रा. कारला रोड वर्धा) यांच्यामार्फत झाली असून त्यासाठी गजू ठाकरे याने ३ लाख ५० हजार रुपये कमिशन स्वरुपात घेतले होते. अखेर वर्धा पोलिसांनी या बनावट कारखान्याचा पर्दाफाश करीत मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे जप्त केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड यांच्या मार्गदर्शनात सेवाग्राम तसेच विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.
१ कोटी ५५ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी ट्रक (जी.जे. १६.ए.वाय. ८२७०) , चारचाकी (एम.एच.३४ एए. ७१४३) , (एमएच ४९, बीए. २१३८), (एमएच ३२, ए.व्ही, ८४३८), (एमएच ३२, डब्ल्यू. २१२१), (एमएच ३२, एएम. २५३१), कपाशीचे सुटे बियाणे वजन ७१११ किलोग्रम, कपाशीच्या बियाणांची प्रत्येकी ४०० ग्रॅमची ३३८ बोगस पाकिटे, लोखंडी रॅक, प्रिंटिंग पॅकिंग सिलिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, १ लाख १८ हजार १३ रिकामे छापील पाकिटे, ट्रकमधून जप्त केलेले ७,०९९ किलोग्रॅम वजनाचे कपाशीचे बोगस बियाणांची पाकिटे आणि ३ लाख ३०० रुपये रोख रक्कमेसह, ७ मोबाइल असा एकूण १ कोटी ५५ लाख ८३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विदर्भातील विविध जिल्ह्यांत झाली विक्री
मागील एक महिन्यापासून हा कारखाना सुरू होता. विदर्भातील वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला आदी जिल्ह्यात वेगवेगळ्या कृषी केंद्रांमार्फत बोगस बियाणांची विक्री केल्याचे तपासात पुढे आले आहे. यापूर्वी आरोपींनी १४ टन बोगस बियाणांची विक्री केल्याचे पुढे आले आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.