वर्धा: प्रवासी वाहतूक करणाऱ्या भरधाव ऑटोच्या चाकाखाली गावठी बनावटीचा एक बॉम्ब अचानक येत त्याचा स्फोट झाला. यात ऑटोचे बऱ्यापैकी नुकसान झाले असून ऑटोचालकासह ऑटोतील दोन प्रवासी थोडक्यात बचावले. ही घटना पुलगाव येथील पुलगाव-नाचणगाव मार्गावरील साई पार्क समोर बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. २९ टी. ११०३ क्रमांकाचा ऑटो प्रवासी घेऊन नाचणगाव येथून पुलगावच्या दिशेने येत होता. भरधाव ऑटो पुलगाव-नाचणगाव मार्गावरील साई पार्क समोर आला असता अचानक जोराचा स्फोट झाला. यामुळे ऑटोचालक शेख फारूक रा. नाचणगाव याच्यासह ऑटोतील प्रवाशांची एकच भांबेरी उडाली. जोराचा आवाज झाल्याने नेमके काय झाले याची माहिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. अशातच ज्या ठिकाणी जोराच्या आवाजानंतर ऑटो थांबला त्या परिसराची घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी बारकाईने पाहणी केली असता तेथे काही गावठी बनावटीचे बॉम्ब आढळून आले.
सदर बॉम्बचा वन्यप्राण्यांना शेतातून पळवून लावण्यासाठी वापरही होत असल्याची चर्चा घटनास्थळी होती. सदर घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलीस स्टेशनचे एएसआय नरेंद्र मते, पोलीस शिपाई सुधाकर बावणे, मनिष देशमुख, रत्नाकर पांडे यांनी घटनास्थळ गाठले. शिवाय घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांना दिली. माहिती मिळताच त्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर घटनेची नोंद घेत तेथून तीन गावठी बनावटीचे बॉम्ब ताब्यात घेत त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावल्याचे खात्रीदायक पोलीस सुत्रांनी सांगितले. या घटनेत ऑटोचे बऱ्यापैकी नुकसान झाले असून ऑटोचालकासह ऑटोतील प्रवाशी थोडक्यात बचावल्याचे सांगण्यात आले. सदर घटनेची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली आहे.