वर्धा : शाळा, महाविद्यालयांचे निकाल लागताच पालक पुढील वर्गाच्या तयारीला लागतात. या महिन्यात अनेकांचा नवीन पुस्तकांसह शालेय साहित्य खरेदी करण्याकडे कल असतो. अनेकांकडे जुन्या वर्गातील पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य पडून असते. हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावे म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचने पुढाकार घेतला आहे. याबाबत सोशल मिडीयावरही जनजागृती केली जात आहे. एप्रिल महिना म्हणजे शालेय शैक्षणिक सत्र समाप्तीचा काळ असतो. परीक्षा आटोपून निकालाची प्रतीक्षा असते. सीबीएसई तसेच तत्सम शाळांचे निकालही जाहीर होत असून पुढील सत्राचे नियोजन केले जात असल्याचे दिसते. पालक तसेच विद्यार्थी नवीन सत्राकरिता आवश्यक असलेली शालेय पुस्तके घेण्याच्या तयारीला लागले आहेत. मग, यापूर्वीच्या पुस्तकांचे काय करणार, असा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे. पाल्य पुढच्या वर्गात गेल्यानंतर बऱ्याचदा जुनी पुस्तके, शैक्षणिक साहित्य घरी अडगळीत पडलेले असते. धूळखात पडत असलेली ही पुस्तके, शैक्षणिक साहित्य निरूपयोगीच ठरते. हीच पुस्तके, शैक्षणिक साहित्य गरजुंना दिल्यास त्यांच्या खर्चात बचत होऊ शकते. शिवाय पुस्तक, शैक्षणिक साहित्याचाही सदुपयोग होणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच वैद्यकीय जनजागृती मंचने पुढाकार घेतला आहे. ही जुनी झालेली पुस्तके, शैक्षणिक साहित्य गरजुंना मिळावी म्हणून व्हीजेएमकडून मोहीम राबविली जात आहे. याबाबत सोशल मिडियावरही जनजागृती केली जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)उपक्रमासाठी पालकांकडून असलेल्या काही अपेक्षाघरी लहान भावंड असतील तर त्यांना ती पुस्तके द्यावीत, शेजारी कुणी परिचित; पण गरजू असेल तर अशा मुलांना ती पुस्तके नक्की द्या. आपल्याकडे कामाकरिता येणाऱ्या धुनी-भांडी करणाऱ्या स्त्रियांकडे त्यांच्या पाल्याबाबत आवर्जुन चौकशी करून पुस्तकांची मदत करावी. पुस्तकांशिवाय वही, रजिस्टर्सही पूर्ण वापरलेले नसतील तर उरलेली कोरी वही फेकू नये. वहिचा स्वत: वापर करावा. पेन्सिल, रबर, स्केल, जॉमिट्रीची उपकरणे आदी नवीन घेणार असाल तर जुने फेकू वा अडगळीत टाकू नका. या बाबी गरजवंताला नक्की द्या, असे आवाहन व्हीजेएमकडून करण्यात आले आहे.विजेत्यांकरिता पुरस्कार योजनाइयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या जुन्या पुस्तकांचे, वह्यांचे व इतर स्टेशनरीचे संकलन करून समाजात अनेक होतकरू आणि गरजवंत मुलांना शोधून आपण दिलेली पुस्तक थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचवेल आणि शक्य झाल्यास वितरण कार्यात आपल्यालाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात भाग्यवान विजेते ठरवून पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रही दिले जाणार आहे. सोशल मिडियावर जागृती मोहीम वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने फेसबुक, व्हॉट्स अॅप यासह अन्य सोशल मिडियावर याबाबत जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविण्याची इच्छा दर्शविल्याचे सोशल मिडियावर निदर्शनास येते. किमान हे करावेपुस्तके सुस्थितीत आणि कव्हर करून असतील तर उत्तमच आहे. वह्या, रजिस्टर्स न वापरलेले व्यवस्थित बार्इंडींग केलेले असल्यास सोयीचे ठरेल. पेन्सिल, पेन, रबर, स्केल एका पाउचमधे दिल्यास उत्तम. शालेय बॅग, दफ्तर सुस्थितीत असेल तर तेही द्यावे. येथे करावी नोंदशैक्षणिक साहित्य देऊ इच्छिणाऱ्यांनी डॉ. सचिन पावडे, बॅचलर रोड वर्धा, डॉ. आनंद गाढवकर आर्वी नाका वर्धा, पांगुळ कॅन्टिन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गांधी चौक वर्धा येथे ३० एप्रिलपर्यंत सकाळी १० ते १२ व सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत नोंद करावी. येथे साहित्य दान करता येणार असल्यचे वैद्यकीय जनजागृती मंचकडून सांगण्यात आले आहे.
गरजू विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके, शालेय साहित्यवैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम : दानदात्यांचे वाढताहेत हात
By admin | Published: April 18, 2017 1:22 AM