लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प निसर्गानुभव उपक्रमासाठी सज्ज झाला असून, वन्यजीव निरीक्षणासाठी अभ्यासक व निसर्गप्रेमी नागरिकांकरिता विविध पाणस्थळांवर तयार करण्यात आलेल्या मचाणींची बांधणी पूर्ण झाली आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पात दिवसा आणि रात्री निसर्गानुभव घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना बुधवार, दि. २२ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयात उपस्थित राहायचे आहे. या उपक्रमासाठी जुने व नवीन वनक्षेत्र तसेच हिंगणी, बांगडापूर व कवडस बफर या वनपरिक्षेत्रात नैसर्गिक पाणस्थळे, कृत्रिम पाणवठ्यांजवळ ३५ मचाणी निर्माण करण्यात आल्या आहेत.
ऑनलाइन नोंदणी न केलेल्या निसर्गप्रेमींनाही या उपक्रमात सहभागी होता यावे, यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत बोर येथील कार्यालयात उपस्थित राहून नोंदणी करता येणार आहे. सहभागी नागरिकांना बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या वाहनाने त्यांच्या मचाणापर्यंत पोहचविण्यात येईल व दुसऱ्या दिवशी दि. २३ मे रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा त्यांना घेण्यासाठी वाहन पाठविले जाईल. यादरम्यान रात्रीच्या भोजनाची व्यवस्थाही मचाणीवर करण्यात येईल. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून सहभागी होण्याचे आवाहन बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी केले.
प्रत्यक्ष प्रगणनेत सहभागी होताना...■ पाणवठ्याजवळील आपल्या मचाणाकडे जाताना आणि येताना गाड्यांचे हॉर्न वाजवू नयेत. गाडीतील रेडिओ, ट्रांजिस्टर बंद ठेवावा. मचाणावर बसून असताना मोठ्याने बोलणे, गाणी म्हणणे, मोबाइलवर अथवा अन्य साधनांवर गाणी ऐकणे पूर्णतः टाळावे. अत्तर अथवा कोणत्याही सुगंधी द्रव्याचा वापर शरीरावर अथवा कपड्यांवर करू नये, प्लास्टीकच्या पिशव्या टाळाव्यात. चॉकलेट अथवा बिस्किटांचे रॅपर, खाद्यपदार्थांची वेष्टणे, रिकामे डबे, तसेच कोणत्याही प्रकारचे प्लास्टीक किंवा निरुपयोगी वस्तू जंगलात न फेकता आपल्या बॅगमध्येच ठेवाव्यात.■ कोणत्याही कारणासाठी जंगलात आग प्रज्वलित करण्यास मनाई आहे. ज्वलनशील पदार्थ, तसेच शस्त्र नेण्यास सक्त मनाई आहे.