वर्धा : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने नटलेला असून, पर्यटकांनाही खुणावतो. त्यामुळे पर्यटकांची पावले या प्रकल्पाकडे वळायला लागल्याने ते मध्य भारतातील नवे आकर्षण केंद्र ठरत आहे. या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करुन वन, वन्यजीव आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला.
भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असलेल्या, मात्र जैवविविधतेने नटलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाला गत १ ऑक्टोबर ते ३१ मे या आठ महिन्यांच्या कालावधीत १० हजार ३४६ पर्यटकांनी भेट दिली असून, सुमारे २० लाखांचे उत्पन्न व्याघ्र प्रकल्पाला मिळाले आहे. नागपूरपासून केवळ ४० मिनिटांवर तर वर्ध्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हा प्रकल्प आहे. १३८.१२ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचा परिसर समृद्ध असून, पर्यटकांकरिता सुखावणारा आहे.
जलस्रोत, टेकड्यांनी समृद्ध परिसर
या व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबटे, अस्वल, रानकुत्रे यासह विविध प्रकारचे मांसाहारी, मिश्राहारी आणि तृणभक्षी प्राणी तसेच पक्ष्यांच्या, फुलपाखरांच्या विविध प्रजातींमुळे तसेच वैविध्यपूर्ण वृक्षराजी, जलस्रोत आणि टेकड्यांमुळे समृद्ध असून, पर्यटकांना सुखावणारा आहे.
संजय इंगळे तिगावकर, मानद वन्यजीव रक्षक
बोर व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाने सर्वांत लहान प्रकल्प असला तरीही येथील जैवविविधता आणि विविध प्रकारच्या प्राणी, पक्ष्यांच्या उपलब्धीमुळे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. विशेषत: व्याघ्र दर्शनाकरिता पर्यटकांची पावले या प्रकल्पाकडे वळत असून, दिवसेंदिवस संख्याही वाढत आहे.
पर्यावरणदिनी फळझाडांची लागवड
पर्यावरण दिनानिमित्त बोर व्याघ्र प्रकल्पातील कारई टेकडीजवळील व्याघ्ररक्षक व पर्यावरणप्रेमी कैलाश सांखला स्मृती कुटी परिसरात संजय इंगळे तिगावकर, वनपरिक्षेत्र नीलेश गावंडे, क्षेत्र सहायक मोरे, वनरक्षक डाखोरे, देशभ्रतार, बडदे, यांच्या हस्ते आम्रवृक्ष व लिंबूवर्गीय फळांचे रोप लावण्यात आले. यावेळी बोर व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी उपस्थित होते.