लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहराचा संवेदनशिल भाग असलेल्या इतवारा व बोरगाव मेघे येथील पोलीस चौकी बंदच असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. या भागातील नागरिकांना किरकोळ गुन्ह्याचीही तक्रार देण्यासाठी रामनगर व शहर पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागते. या पोलीस चौक्या नेहमीच बंद राहतात. अशी माहिती लोकमतच्या प्रतिनिधीला या भागातील नागरिकांनी दिली.शहर पोलीस स्टेशन व सेवाग्राम पोलीस ठाण्यातील वाढता कामाचा ताण लक्षात घेता दोन्ही पोलीस ठाण्याचे विभाजन करून रामनगर व सावंगी (मेघे) पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. पूर्वी पेक्षा सध्या कामाचा ताण कमी असल्याचे शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांमध्ये नेहमीच चर्चा होते. मात्र, याच पोलीस ठाण्याच्या देखरेखीत चालणारी इतवारा व बोरगाव (मेघे) पोलीस चौकी नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकारामुळे अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन्ही चौकीत पुरेशा मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते;पण नेहमीच दोन्ही पोलीस चौकी कुलूप बंद राहत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. त्रास सहन करीत बोरगाव व इतवारा भागातील नागरिकांना शहर पोलीस ठाणे गाठून पोलिसी मदत मिळवावी लागत आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस चौकी चोवीस तास सुरू करण्याची व्यवस्था अशी मागणी या भागातील नागरिकांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना केली.इतवारा परिसर अतिशय संवेदनशीलशहरातील इतवारा भाग हा अतिशय संवेदनशील परिसर म्हणून ओळल्या जातो. या भागात रोजमजूरी करणारे तसेच काही अवैध व्यवसाय करणारेही वास्तव्याला आहेत. मद्यपींचा डेरा राहत असल्याने नेहमीच या भागात छोटे-मोठे तंटे होतात. परंतु, याच भागातील पोलीस चौकी नेहमीच कुलूप बंद राहत असल्याने नागरिकांना वेळीच पोलिसांची मदत मिळत नसल्याची ओरड आहे.बोरगाववासियांना मनस्तापबोरगाव (मेघे) येथील नागरिकांना पोलिसांची मदत मिळवून घेण्यासाठी पोलीस चौकी तयार करण्यात आली. मात्र, नेहमीच ही पोलीस चौकी बंद राहत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करीत शहर पोलीस स्टेशन गाठून पोलिसी मदत मिळवावी लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता वरिष्ठांनी त्वरित योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.दोन्ही पोलीस चौकीत पुरेसे मनुष्यबळवर्धा शहर पोलीस स्टेशनच्या देखरेखीत चालणाºया बोरगाव (मेघे) व इतवारा पोलीस चौकीत पुरेसे मनुष्यबळ देण्यात आले आहे. इतवारा चौकीत चार कर्मचारी तर बोरगाव (मेघे) पोलीस चौकीत चार पोलीस कर्मचारी नियुक्त असल्याचे सांगण्यात येते. परंतु, त्यांच्याकडे शहर पोलीस ठाण्यातील अतिरिक्त कामाचा बोझा टाकल्या जात असल्याचे वास्तव आहे.दोन्ही पोलीस चौकीत चार-चार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. शहर पोलीस ठाण्यातील कामाचा ताण लक्षात घेता त्यांनाही काही कामे सोपविण्यात आली आहेत. विविध प्रकरणांच्या तपासामुळे व कामाच्या व्यापामुळे कधीकाळी चौकी बंद असू शकते. नेहमीच चौकी बंद राहत नाही. तसेही दोन्ही चौकी आणि शहर पोलीस ठाण्याचे अंतर फारच कमी आहे.- चंद्रकांत मदने, ठाणेदार शहर पोलीस स्टेशन.
बोरगाव (मेघे) व इतवारा पोलीस चौकी बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:04 PM
वर्धा शहराचा संवेदनशिल भाग असलेल्या इतवारा व बोरगाव मेघे येथील पोलीस चौकी बंदच असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.
ठळक मुद्देनेहमीच असते कुलूप बंद : तक्रार देण्यासाठी यावे लागते ठाण्यातच