समुद्रपूर/नारायणपूर : तालुक्यातील गणेशपूर व मांडगाव येथे घडलेल्या दोन घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना बुधवारी उघड झाल्या. जयश्री पाल व देविदास सराते अशी मृतकांची नावे आहेत. गणेशपूर येथील विद्यार्र्थिंनी जयश्री रमेश पाल (१९) ही आपल्या घरच्या शेतात काम करीत होती. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान शेजारी असलेल्या शेतात ती पिण्याकरिता पाणी आणण्याकरिता विहिरीवर गेली होती. येथे तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी उघड झाली. मृतक जयश्री ही समुद्रपूरच्या झोटिंग महाविद्यालयत बी. ए. प्रथम वर्षाला शिकत होती. शेतात अधिक काम असल्याने ती आई वडीलांसोबत ती गेली होती. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शेजारच्या हेमंत निखाडे यांच्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्याकरिता गेली असता पाय घसरून ती विहिरीत पडली. पाण्याचा आवाज आल्याने मुलगी विहिरित पडल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण पाणी खोल असल्याने अपयश आले. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे. दुसरी घटना मांडगाव येथे घडली. येथील देविदास मंगल सराते (५५) हा शिवनी गावाकडून मांडगावकडे परत येत असताना वणा नदीमधून जात होता. यात खोल पाण्यात डोहामध्ये बुडून त्याचा मुत्यू झाला. सदर दोन्ही घटनेचा तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर )
पाण्यात पडून दोघांचा मृत्यू
By admin | Published: March 10, 2017 12:50 AM