लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरुवातीपासून कोरोनामुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. सलग तिसऱ्या दिवशी आर्वीच्या नगराध्यक्षांसह जिल्ह्यात २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात वीज वितरण कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. रायगड येथून परत आलेल्या वीज वितरण विभागातील कर्मचाऱ्यांपैकी आणखी एक व्यक्ती कोरोनाबधित असल्याचे निदान झाले असून ही व्यक्ती वर्धा विभागात काम करते आणि नागपूर येथील रहिवासी आहे. यापूर्वीच महावितरण कंपनीतील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच आर्वीच्या नगराध्यक्षांना सर्दी, खोकला असल्यामुळे त्यांचा स्त्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता २८ झाली असून १२ रुग्ण कोरोनामुक्त तर १५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिली आहे.
वर्धा जिल्ह्यात आर्वीच्या नगराध्यक्षांसह दोघे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:42 IST