दोन महिन्यांपासून पगार नाही : अध्यादेशास एक वर्ष होऊनही ‘ग्रेड पे’ चा प्रश्न खितपतचवर्धा : जुलै महिन्यापासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे वेतन संबंधित कर्मचारी व विभाग प्रमुखांच्या नाकर्तेपणामुळे रखडले आहे. सप्टेंबर महिना अर्धा संपत असताना वेतनाबाबत हालचाली झाल्या नाही. यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या सभेवर वर्धा तालुका ग्रामसेवक संघटनेने बहिष्कार टाकला. पोळा हा सण असताना संबंधित पं.स. लिपिक, अधीक्षक, विभाग प्रमुख व जि.प. वित्त विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वेतनाचा प्रश्न जटील झाला आहे.जुलै महिन्यापासून ग्रामसेवक वेतनापासून वंचित आहे. याबबात वरिष्ठांना विनंती अर्ज, निवेदने देण्यात आली; पण अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. मे महिन्यापासून सूचना देऊनही वेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्याने ग्रामसेवकांत असंतोष पसरला आहे. ९ सप्टेंबर २०१४ रोजीच्या शासन आदेशास एक वर्षांचा कालावधी लोटला; पण अद्याप आश्वासित योजना १२/२४ ग्रेड पे चा प्रश्न निकाली निघाला नाही. यासाठी संबंधित लिपिक व विभाग प्रमुख जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. केंद्राच्या १३६ आणि राज्याच्या ११२ योजना राबविताना ग्रामसेवकांची कसरत होत आहे. निर्मल ग्राम अभियान, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना व इतर सभा यामुळे गावाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांचा कणाच मोडला गेला आहे. यातच वेतन न झाल्यामुळे शैक्षणिक शुल्क कर्ज, गृहकर्ज, विमा हप्ते अदा करणे कठीण झाले आहे.जुलैपासूनचे वेतन जोपर्यंत दिले जाणार नाही, तोपर्यंत सभेवरील व अहवालांवरील बहिष्कार कायम राहणार आहे. ग्रामसेवक चांदुरकर, के.पी. बर्धिया, बिडवाईक, सुरकार, जामूनकर, अतुल भोगे, इवनाथे, गोल्हर, किरण वरघणे, ढोक, गावंडे, आसुटकर यासह सर्र्व ग्रामसेवक व ग्रामसेविका बहिष्कारात सहभागी झाले आहेत. याबाबत निवेदन सादर करण्यात आले असून गटविकास अधिकारी सपकाळ यांनी भेट देऊन ग्रामसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या.(कार्यालय प्रतिनिधी)
वेतन रखडल्याने ग्रामसेवकांचा सभेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2015 2:03 AM