लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : जागा चुकलेल्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा अनेक गावांना फटका बसत आहे. अहिरवाडा गावाला तर बॅक वॉटरने चांगलेच त्रस्त केले. पाणी वाढले, रोहित्र, विद्युत पेट्या व खांब बुडणार, हे कारण देत तीन दिवसांपूर्वी वीज पुरवठाच खंडित करण्यात आला. यामुळे काळोखात खितपत जगावे लागले. ग्रामस्थांची ओरड वाढताच वीज पुरवठा सुरळीत केला गेला. यात ग्रामस्थांसह स्वयंभू अंबिका भवानी मंदिरात दर्शनार्थ आलेले भाविकही भरडले गेले.अहिरवाडा येथे स्वयंभू अंबिका भवानी मातेचे पुरातन मंदिर आहे. यामुळे परिसरातील तथा बाहेरगावातून अनेक भाविक नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी येतात. निम्म वर्धा प्रकल्पाचा पाणीसाठा वाढल्याने बॅक वॉटर अहिरवाडा येथील रोहित्रापर्यंत पोहोचले. रोहित्र लागून असलेले लोखंडी खांब पाण्यात बुडाले; पण रोहित्र व मुख्य विद्युत प्रवाह करणारी विद्युत पेटी पाण्याच्या पातळीपासून वर होती. असे असताना महावितरणने अचानक वाढलेल्या पाण्याचे कारण देत अहिरवाडा गावातील वीज पुरवठा शुक्रवारी बंद केला. अनेक शेतकºयांचे विद्युत पंप पाण्यात बुडाले आहेत. यामुळे गावातील नागरिकांचे हाल होत आहे. शिवाय बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनाही वीज पुरवठा खंडित असल्याने त्रास सहन करावा लागला. यामुळे नागरिकांत कमालीचा रोष होता. पाण्याखाली येणाºया रोहित्राचे स्थलांतर करावे, अशी मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे; पण महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, दरवर्षी बॅक वॉटर वाढले की, वीज पुरवठा खंडित केला जातो. यावर महावितरणने कायमस्वरूपी तोडगा काढणे अपेक्षित आहे; पण याकडे कंपनी व लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. ऐन नवरात्रीतही भारनियमन करण्यात आले. शिवाय अहिरवाडा गावाचा वीज पुरवठाही खंडित केल्याने काळोखात चाचपडावे लागले. यामुळे ग्रामस्थ तथा भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.प्रकल्पाचे बॅक वॉटर वाढणार, हे माहिती असल्याने रोहित्र स्थलांतरणाचे काम उन्हाळ्यातच होणे अपेक्षित होते; पण संबंधित अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले. हे काम उन्हाळ्यात झाले असते नागरिकांना काळोखात राहावे लागले नसते. शिवाय शेतकºयांच्या कृषी पंपांचे नुकसान झाले नसते. वीज खंडित केल्याने हळद, कपाशीच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अरविंद देविदास कदम रा. देऊरवाडा या शेतकºयाला आपल्या शेतातील विद्युत पंप सुरू करण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागते. निम्म वर्धा प्रकल्पातील बुडित क्षेत्रातील अहिरवाडा गावातील ६० घरे तथा अल्लीपुर, निंबोली (शेंडे) ही गावे स्थलांतरित करण्याचे काम अद्याप शिल्लक आहे. यामुळे या गावातील समस्यांकडे अधिकारी लक्ष देत नाहीत. प्रकल्पाचे पाणी वाढत असल्याचे कारण देत वेळोवेळी विद्युत पुरवठा अचानक खंडित केला जातो. महावितरण, जिल्हा प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.प्रकल्पबाधित गावांच्या विकासाकडेही दुर्लक्षअहिरवाडा, निंबोली शेंडे, अल्लीपूर ही निम्म वर्धा प्रकल्पाची बाधित गावे आहेत. परिणामी, या गावांतील विकास कामेही ठप्प आहेत. यामुळे या गावांची अवस्था आदिवासी क्षेत्रातील तांड्यांप्रमाणे झाल्याचे दिसते. या गावांपर्यंत पोहोचण्यासाठीही कसरत करावी लागते. रस्त्यांची दुरवस्था, नाल्या नाही, बॅक वॉटरचा त्रास यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. पुनर्वसन विभाग व शासकीय यंत्रणांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.ग्रामस्थांची वीज कार्यालयावर धडकतीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला होता. काळोखात चाचपडावे लागत असल्याने तथा शेतपिकांचे नुकसान होत असल्याने अहिरवाडा गावातील ३० ते ४० नागरिकांनी विद्युत कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी नागरिकांचा संताप पाहून विद्युत पुरवठा तात्पुरता सुरळीत करण्यात आला; पण अद्याप कायम तोडगा काढण्यात आला नाही वा त्यावर विचारही करण्यात आला नाही. यामुळे ही समस्या वारंवार उद्भवणार आहे. यामुळे महावितरणने कायम तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अहिरवाडा येथे निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाण्याची पातळी वाढल्याने कोणताही धोका होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तो दुसºया दिवशी सुरू करण्यात आला. अहिरवाडा येथील ग्रामस्थांची ही समस्या तात्पुरती दूर करण्यात आली आहे.- राजेश जयस्वाल, उपविभागीय अभियंता, विद्युत वितरण कंपनी, आर्वी.
बॅक वॉटरमुळे वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 10:27 PM
जागा चुकलेल्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा अनेक गावांना फटका बसत आहे. अहिरवाडा गावाला तर बॅक वॉटरने चांगलेच त्रस्त केले.
ठळक मुद्देअहिरवाडा येथील प्रकार : तीन दिवसांनंतर तात्पुरती दुरूस्ती, रोहित्रासह वीज खांब, पेट्या पाण्यात