लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या अडचणीत भर पडली आहे. कोविडबाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जात असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात होणाऱ्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियांवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सद्य:स्थितीत तब्बल २१६ ज्येष्ठ नागरिक डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची प्रतीक्षा करीत आहेत.गरीब व गरजूंसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय उपयुक्तच ठरणारे आहे; परंतु कोविड संकटामुळे या रुग्णालयातील इतर सेवांकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. कायमस्वरूपी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना कोविड संसर्ग झाल्यापासून जिल्हा शल्यचिकित्सक उंटावरून शेळ्या हाकत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याची ओरड सध्या होत आहे. एरवी प्रत्येक महिन्याला डोळ्याच्या १२ ते १५ शस्त्रक्रिया या रुग्णालयात व्हायच्या; परंतु सध्या तब्बल २१६ गरजू नेत्र शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्हा रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय या रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात थोड्या-अधिक प्रमाणात सध्या कोविडबाधितांवर उपचार होत आहेत. नेत्र विभागात २० खाटांची क्षमता आहे; परंतु तो विभाग कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहित करण्यात आला आहे. त्यामुळे नेत्र शस्त्रक्रियांना सध्या ब्रेक लागल्याचे वास्तव आहे. असे असले तरी प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी सध्या प्रयत्न होत आहेत.- डॉ. किरण मडावी, प्रमुख, नेत्र विभाग, सा. रु., वर्धा.
अंधार कधी दूर होणार?
नेत्र शस्त्रक्रियेसाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात रीतसर प्रक्रिया केली; परंतु वेळीच शस्त्रक्रियेसाठी निरोप आला नाही. अशातच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाची गाडी गावात आली होती. त्यामुळे आपण सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात एक महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया केली.- उमा कांबळे, शेगाव (कुंड).
जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची इच्छा दर्शवीत त्याबाबत माहिती जाणून घेतली; पण कोविडमुळे शस्त्रक्रिया होणार नाही, असे सांगण्यात आल्याने वर्धा शहरातील खासगी रुग्णालयात आपण शस्त्रक्रिया केली आहे.- अरुण राऊत, बोरगाव.
नेत्र शस्त्रक्रियेसाठी आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात नोंदणी केली आहे; परंतु अद्यापही रुग्णालयाकडून शस्त्रक्रियेसाठी अपॉइंटमेंट देण्यात आलेली नाही. रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नेत्र विभागात शत्रक्रिया सुरू केल्या पाहिजेत.- वसंत सातघरे, करंजी (काजी).