रोहणा (वर्धा) : विवाह म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. आपल्या जीवनसाथीसोबत सात फेरे घेण्याचे स्वप्न रंगवत, या क्षणाचे साक्षीदार होणाऱ्या वऱ्हाड्यांसह नवरदेवाची वरात वधू मंडपी दाखल झाली. पण, जिच्यासाठी हा सर्व खटोटोप केला तिचा जीव प्रियकरावर जडल्याने नवरदेवाला आल्या पावलीच परतावे लागले. या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविण्याची वेळ आली. हा धक्कादायक प्रकार रोहणा येथे गुरुवारी घडला असून, दिवसभर परिसरात याचीच चर्चा होती.
आर्वी तालुक्यातील सायखेडा येथील तरुणाचा विवाह अमरावती जिल्ह्यातील नवीन वाठोडा गावातील मुलीसोबत ठरला होता. विवाहापूर्वीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर विवाहाकरिता रोहणा येथील वनसंपदा मंगल कार्यालय ठरविण्यात आले. विवाहाची तारीख निश्चित करून आप्तेष्टांना निमंत्रण पत्रिकाही पाठविल्या. त्यामुळे या विवाहाची वधू-वर अशा दोन्ही पक्षांकडे धुमधडाक्यात तयारी सुरू होती. परंतु, मुलीच्या मनात काही वेगळंच चाललयं, याचा कुणाला साधा संशयही आला नाही.
गुरुवार, ३० मार्च रोजी सकाळी ११:०५ वाजता विवाह मुहूर्त असल्यामुळे वधूसह तिच्याकडील सर्व मंडळी बुधवारी रात्रीच रोहण्याच्या सभागृहात दाखल झाले होते. त्यांनी रात्रीपासूनच आजच्या विवाहाची तयारी चालविली होती. वराकडील मंडळीही गुरुवारी विवाह असल्याने ठरलेल्या वेळेपर्यंत वाजत-गाजत वधू मंडपी पोहोचली. परंतु, विवाहाची वेळ झाल्यानंतरही वधू येत नसल्याने अनेकांना प्रश्न पडला. काही वेळात सभागृहात काळजीचे वातावरण निर्माण झाले. वधू पक्षाकडील लोकांनाही कोणतीच कल्पना नसल्याने तेही शोधाशोध करू लागले.
दुपारी ३ वाजले तरीही वधूचा काहीच पत्ता नसल्याने अखेर विवाहस्थळी खळबळ उडाली. तेव्हा वधूने पहाटेच संधी साधून प्रियकरासोबत पलायन केल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे संतापलेल्या वर मंडळींनी विवाहस्थळ सोडून थेट पुलगाव पोलिस ठाणे गाठले. वधूच्या या निर्णयामुळे वधू आणि वर पक्षाकडील मंडळींची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे विवाहस्थळी शांतता पसरली होती. वऱ्हाड्यांकरिता केलेला स्वयंपाकही वाया गेला. काहींनी जेवण केले तर काही तसेच निघून गेले. वराकडील झालेला खर्चही व्यर्थ गेला. आता पुलगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.