लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी : सध्या परिसरात विका कामे सुरू आहेत. यात संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने तथा पाहणी केली जात नसल्याने निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत नागरिकही ओरड करीत असताना कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पावसापूर्वी कामे उरकण्याच्या लगीनघाईने कंत्राटदाराने नाल्यावरील पुलाचे काम अत्यंत निकृष्ट केल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. याची चौकशी करीत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.येथील वार्ड क्र. ४ अंतर्गत येणाऱ्या वानरविहरा गटग्रामपंचायत हिगणी येथे गावानजीक नाल्यावर पुलाचे बांधकाम केले जात आहे. नागपूर ते हिंगणी तसेच स्मशान भूमीपर्यंत सिमेंट रोड व नाल्यांवर पुलांचे बांधकाम केले जात आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे दहा लाख रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे; पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. कामाच्या ठिकाणी सूचना तथा माहिती फलक लावणे गरजेचे असते; पण या परिसरात कुठेही फलक लावल्याचे दिसून येत नाही. सदर फलकावर कामाचे नाव, स्वरूप, कामाची किंमत, कंत्राटदाराचे नाव आणि विभागाचे नाव नमूद केले जाते; पण कंत्राटदार कुठलाही फलक न लावताच काम करीत आहे.सदर कामासाठी वापरले जात असलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यावरून त्यांनी माजी ग्रा.पं. सदस्य नितीन निघडे यांच्याकडे धाव घेत माहिती दिली. निघडे यांनी गावातीलच काही नागरिकांसह कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यात सदर काम नावापूरतेच केले जात असल्याचे दिसून आले. पावसाळ्यात पहिल्या पुरातच सदर पूल वाहून जाण्याची भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली. यासाठी वापरण्यात येणारी वाळू नाल्यातील गाळ असल्याचेच दिसून आले. यामुळे तक्रारी करण्यात आल्या असता कुणीही दखल घेत नसल्याने नागरिक हैराण आहेत. गामस्थांनी ग्रा.पं. प्रशासनाला कामाबाबत विचारणा केली असता सदर काम योग्यरित्या होत असल्याचा शेरा देण्यात आला आहे. पाहणी न करताच काम योग्य असल्याचे सांगितले जात असल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.शासकीय निधीचा अधिकारी, कंत्राटदारांकडून दुरूपयोगहिंगणी परिसरात होत असलेल्या पुलांच्या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सेलू विभागातील अभियंते उंटावर बसून शेल्या हाकण्याचे काम करीत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. पुलाचे बांधकाम पूर्ण होत असतानाही पाणी करण्यात आली नसल्याने कंत्राटदार मनमर्जी काम करीत शासकीय निधीचा दुरूपयोग करीत असल्याच्या प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करीत आहेत. शासकीय निधी कामांकरिता की, कमिशनखोरीसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.