लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सत्य आचरणात आणणे सहज सोपे नाहीच; पण काहींनी ते आपल्या आचरणात आणल्याचे वास्तव आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात सत्य आणि अहिंसेचे महत्त्व ओळखून सत्य आचरणात आणले. ज्या इंग्रज सत्तेचा सूर्यास्त होत नव्हता, अशांसोबत महात्मा गांधी यांनी अहिंसेला शस्त्र बनवून लढा दिला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात ‘गांधी का दर्शन : वैश्विक साम्प्रदायिकता का समाधान’ या विषयावर आयोजित संगोष्ठित ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती प्रो. रजनीशकुमार शुक्ल, कुलसचिव कादर नवाज खान, नितीश भारद्वाज, कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचे कुलपती श्रीनिवास वरखेडी यांची उपस्थिती होती. राज्यपाल पुढे म्हणाले, मानवी जीवनाचा प्रत्येक विषय गांधींच्या विचाराने प्रभावित होतो. गांधी विचारांमध्ये गीता, बुद्ध, नानक, रामदास यांचे दर्शन होते. आत्मकथेत अनेक व्यक्ती आपल्या कमजोरी लपवितात; पण बापूंनी आपल्या कमजोरी लपविलेल्या नाहीत. संस्कार आणि भाषेला गांधींनी महत्त्व देत देशाला एकत्र आणण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला. गांधींकडे दूरदृष्टी होती. त्यांचे विचार आत्मसात करून देशालाच नव्हे, तर जगालाही प्रगती साधता येत असल्याचे यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट केले.नितेश भारद्वाज यांनी सध्या व्यवसायप्रधान शिक्षण दिले जात आहे; पण आज आत्मविश्वासी मानव निर्मितीच्या शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. अमृतमहोत्सवी वर्षात आपण दिशा निश्चित केल्यास पुढील २५ वर्षांमध्ये भारताचा आणखी विकास होईल. शिवाय भारत विश्वगुरू होईल, असेही स्पष्ट केले. महर्षी, देवर्षी व राजर्षी, असे तीन द्रष्टे आहेत; पण महात्मा गांधी यांनी महात्मा हा नवा द्रष्टा रचला. सत्याची अनेक मुखे असून, महात्मा गांधी हे सत्याचे उपासक होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे कुलपती रजनीशकुमार शुक्ल यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कुलसचिव कादर नवाज खान यांनी मानले.
गांधी हिल्सवर राज्यपालांनी केले दीप प्रज्वलित - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय परिसरातील गांधी हिल्स येथे दीप प्रज्वलित करून दीपोत्सवाचा शुभारंभ केला. यावेळी हिंदी विश्व विद्यापीठातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.