लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव (नि.) : वायगाव ते सोनेगाव (बाई) मार्गावर भदाडी नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा या भागातील एका धनाढ्य शेतकऱ्याने दोन वर्षापूर्वी तोडला. याची सर्वत्र बोंब झाली तरी लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. शिवाय त्या बंधाऱ्याची साधी डागडुजीही करण्यात आली नाही. संबंधित अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा बंधारा पाणी अडविण्याकरिता कुचकामी ठरत आहे. बंधारा तोडणाऱ्या कथित शेतकऱ्याने या भागात नव्याने शेती विकत घेतली. या बंधाऱ्यामुळे त्याच्या शेतात पाणी जाण्याची भीती असल्याने त्याने तो तोडल्याची माहिती आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणी अडवा पाणी जिरवाचा नारा देण्यात येत आहे. त्यावर श्रमदान करून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र येथे तुटलेला बंधारा दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. गत दोन वर्षांपासून कुठलीही कार्यवाही न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. वायगाव ते सोनेगाव मार्गावरील भदाडी नदीवर भूजल विभागाने २००५-२००६ च्या सुमारास सिमेंटचा पक्का बंधारा बांधला होता. या बंधाऱ्यामुळे ग्रामपंचायत नळयोजनेच्या विहिरीला पाणी वाढले होते. सोबतच शेतातील विहिरीची पातळी वाढण्यास मदत झाली होती. ६.१६ लाख रुपयांचा खर्च वाया भूजल सर्वेक्षण विभागाकडून ६ लाख १६ हजार रुपयांचा खर्च २००५-०६ मध्ये हा बंधारा बांधण्यात आला. मात्र एका धनाढ्य शेतकऱ्याने तो आपल्या फायद्यासाठी फोडला. परिणामी खर्च वाया गेला. शिवाय या घटनेला दोन वर्षांचा कालावधी होत असताना कार्यवाहीही करण्यात आली नाही. याबाबत संबंधीत विभागांकडे तक्रारी करूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. आमच्या विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी व ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर असल्याने सिमेंटचा बंधारा २००५-०६ च्या दरम्यान बांधण्यात आला होता. बांधकामानंतर बंधारा १२ सप्टेंबर २००६ तारखेला ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करण्यात आला. पण बंधारा फोडला असल्याने व ती योजना आमच्या विभागातून बंद झाल्याने जलयुक्त शिवारातून डागडुजी करण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येईल. - मंगेश चौधरी, वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल विभाग, वर्धा
तोडलेला बंधारा दोन वर्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 19, 2017 2:14 AM