वर्धा : बंदुकीत गोळी कशी भरतात याची माहिती देत असताना अचानक फायर झाला. यात एक महिला जखमी झाली. ही घटना स्थानिक गिट्टीफैल भागात मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली असून या विना परवाना बंदूक बाळगणा-या जि. प. सदस्य उमेश जिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीची बंदूक जप्त केली आहे. निकीता साई डोईफोडे रा. जिंतूर जि. परभणी, असे जखमी महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे जखमी महिला ही आरोपीची बहिण आहे.
पोलीस सुत्रानुसार, जि.प. सदस्य उमेश जिंदे, त्यांची पत्नी रितू जिंदे व उमेदची बहिणी निकीता डोईफोडे हे कौटुंबिक छोटेखानी कार्यक्रम आटोपल्यावर घरासमोर उभे होते. याप्रसंगी निकीता हिने दादा तू नेहमीच रात्री उशीरापर्यंत बाहेर राहतो. स्वत:ची काळजी घेत जा अशा आशयाचा सल्ला उमेशला दिला. त्यावर उमेशने घाबरू नका मी स्वत:च्या रक्षणासाठी बंदूक बाळगतो असे म्हणत जवळ असलेली बंदूक निकीताला दाखविली. त्यानंतर निकीतानेही मोठ्या उत्सूकतेने दादा बंदुकीत गोळी कशी भरल्या जाते अशी विचारणा केली. त्यानंतर बंदुकीत गोळी कशी भरल्या जाते याचे प्रात्येक्षिक दाखवित असताना अचानक बंदुकीतून गोळी सुटली आणि ती निकीताच्या हाताला चाटून जात तिच्या पोटात शिरली.
रक्तस्त्राव होत असल्याने सर्वांची एकच तारांबळ उडली. त्यानंतर जखमी निकीताला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे तसेच रामनगर पोलीस ठाण्यातील अधिका-यांच्या चमूने घटनास्थळ गाठून परिसराची बारकाईने पाहणी केली. या प्रकरणी रितू जिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी जि.प. सदस्य उमेश जिंदे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०८, हत्यार कायद्याच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक गावठी बनावटीची बंदूक जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश इटकर करीत आहेत.