हिंगणघाट : शहरात महिलांकरिता स्वतंत्र व स्वच्छ प्रसाधनगृह नाही. यामुळे महिलांची कुचंबना होते. नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. ही गैरसोय टाळण्याकरिता महिलांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृह त्वरित बांधावे, अशी मागणी नगर विकास सुधार समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याची दखल न घेतल्यास १६ एप्रिल रोजी नगर पालिकेसमारे धरणे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमुद केले आहे.शासनाच्या धोरणानुसार महिलांकरिता सार्वजनिक स्थळी स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. बीओटी तत्वावर प्रसाधनगृहांची निर्मिती करण्याबाबत पालिकेने निर्णय घ्यावा, या कामाला पुढील आठ दिवसांत सुरूवात न झाल्यास गुरूवारी धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. प्रसाधन व स्वच्छतागृह हे मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार, पोस्ट आॅफिस रस्ता, बसस्थानक रस्ता, विठोबा चौक, शिवाजी पार्क, सुभाष चौक आदी स्थळांवर सुरू केल्यास महिलांकरिता सोयीचे होईल. तसेच ज्या ठिकाणी स्वच्छतागृह आहे, त्या ठिकाणी पाण्याची टाकी आणि मोटारपंप बसविण्याची मागणी करण्यात आली. अनेकदा पाणी उपलब्ध राहत नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर करणे गैरसोयीचे ठरते. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे; परंतु नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रसाधनगृहाकरिता आलेल्या निधीचा पालिका प्रशासनाकडून वापर करण्यात आला नसल्याची माहिती आहे. यासह आदी समस्यांबाबत शिष्टमंडळाने चर्चा केली. पालिका प्रशासनाने योग्य कारवाई करून प्रसाधनगृहांची निर्मिती करावी, या मागणीचे निवेदन देताना प्रा. दिवाकर गमे, मनोज रुपारेल, राजेश जोशी, अखिल धाबर्डे, नरेंद्र चुंबळे, नरेश पांढरे, अरविंद जवादे, महेश खडसे, प्रमोद जुमडे, राजू अरगुले यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी जगताप यांनी निवेदन स्विकारून शिष्टमंडळासोबत चर्चा केली.(शहर प्रतिनिधी)
सार्वजनिक स्थळी स्वच्छतागृह बांधा
By admin | Published: April 10, 2015 1:42 AM