वर्धा : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेल्या समस्या त्वरित दूर कराव्या, अशी मागणी इमारत बांधकाम कामगारांनी केली. यासाठी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. विठ्ठल मंदिर रोड बढे चौक येथून निघालेला कामगारांचा मोर्चा बजाज चौक, रेल्वे स्टेशन मार्गे कामगार अधिकारी कार्यालयावर धडकला. यशवंत झाडे, महेश दुबे, सिताराम लोहकरे, शरद पालांदुरकर, विनोद तडस, अक्षय कांबळे, रमेश कौरती, कमलाकर मरघडे, सुनीता ढवळे, सुरेश तडस, संध्या संभे, अनिल निमजे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातून हजारावर कामगार महिला व पुरूष मोर्चात सहभागी झाले. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर कामगारांची सभा झाली. यात लोहकरे यांनी बांधकाम कामगार दुसऱ्यांची कलाकुसरीने घरे बांधतात; पण त्यांचे स्वत:ची घरे नाल्याकाठी वा झोपडपट्टीत असतात. या कष्टकरी कामगारांसाठी शासनाने ईमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बनविले. अनेक सुविधा दिल्या; पण दप्तरदिरंगाईने त्या त्यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाही. अनेक लाभांची सुविधा असल्याने दलालांचा सुळसुळाट झाला असून आर्थिक प्रलोभने देऊन प्रत्यक्ष कामगार नसलेल्यांची कामे होतात; पण खरे कामगार वंचित राहतात, असे सांगितले. यावेळी कामगार अधिकारी गुल्हाणे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मागण्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)शासन व कामगार कल्याणकारी मंडळाला मागण्या कळविणारराज्य मंडळाशी संबंधित ३० आॅगस्ट २०१४ नंतर नोंदणी केलेल्या कामगारांना ३ हजार रुपये देणे, कामगारांच्या दोन मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी ५१ हजार अनुदान, दिवंगत कामगारांच्या व वयाची ६० वर्षे पूर्ण कामगारांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन या बाबी राज्य शासन व कामगार कल्याणकारी मंडळाशी संबंधीत असल्याने मुख्यमंत्री व कामगार आयुक्त मुंबई यांना कळविण्याचे आश्वासन कामगार अधिकारी गुल्हाणे यांनी यावेळी दिले.
प्रलंबित मागण्यांसाठी इमारत बांधकाम कामगारांचा मोर्चा
By admin | Published: June 07, 2015 2:24 AM